मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशासनाकडून टाळाटाळ, अशोक चव्हाण यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 17:58 IST2022-08-10T17:58:03+5:302022-08-10T17:58:52+5:30
Maratha Reservation : या प्रकरणी अशोक चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. तसेच, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशासनाकडून टाळाटाळ, अशोक चव्हाण यांचा आरोप
मुंबई: मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस (EWS) प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणी अशोक चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. तसेच, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यासाठी तहसिलदार टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी येत असून, राज्य शासनाने जिल्हा व तालुका प्रशासनांना तातडीने निर्देश देऊन मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत कोणताही न्यायालयीन अडसर नसल्याचे स्पष्ट करावे.
सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) आरक्षण रद्द केल्यानंतर त्या काळात अपूर्णावस्थेत असलेल्या नोकरभरती प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाचे (ईडब्ल्यूएस) लाभ देण्याचा निर्णय मागील राज्य सरकारच्या काळात घेण्यात आला होता. मात्र, त्या निर्णयाला उच्च न्यायालयाने रद्दबातल केले आहे, असे अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
याचबरोबर, सदरहू निर्णय केवळ अपूर्णावस्थेत असलेल्या नोकरभरती प्रक्रियेतील तत्कालीन एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी होता. त्या निर्णयाचा मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचे लाभ मिळण्याविषयी काहीही संबंध नाही. तरी देखील तहसीलदार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहेत. सध्या अनेक शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया तसेच नोकरभरती प्रक्रियांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असेही अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.