"आशिष देशमुखांचं मानसिक संतुलन बिघडलंय; त्यांना उपचारांची गरज"; काँग्रेस प्रवक्त्यांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 16:58 IST2023-04-04T16:57:30+5:302023-04-04T16:58:29+5:30
Congress Spokesperson Atul Londhe Criticize Ashish Deshmukh: देशमुखांची वक्तव्ये पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, त्यांना चांगल्या उपचाराची गरज असून ते त्यांनी लवकरात लवकर करुन घ्यावेत, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

"आशिष देशमुखांचं मानसिक संतुलन बिघडलंय; त्यांना उपचारांची गरज"; काँग्रेस प्रवक्त्यांची बोचरी टीका
मुंबई - आशिष देशमुख हे वारंवार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत असतात. देशमुखांची वक्तव्ये पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, त्यांना चांगल्या उपचाराची गरज असून ते त्यांनी लवकरात लवकर करुन घ्यावेत, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, लोकशाही प्रक्रियेत वेगवेगळे विचार असणे स्वाभाविक आहे, काँग्रेस हा लोकशाही माननारा पक्ष आहे. जर कोणाला एखाद्या विषयावर काही वेगळे मत मांडायचे असेल तर त्यांनी ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडले पाहिजे परंतु आशिष देशमुख हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल प्रसिद्धी माध्यमांमध्ये जाणीवपूर्वक विधाने करून वातावरण गढूळ करण्याचे काम करत असतात. खोक्याची भाषा राज्यात कोणाला उद्देशून केली जाते हे सर्वांना माहित आहेच तसेच आशिष देशमुख यांचा बोलविता धनी कोण आहे हेही माहित आहे.
प्रदेश काँग्रेसने त्यांना ताकीद देऊनही त्यांच्या वागण्यात फरक पडलेला नाही. देशमुख यांना जनतेने नाकारलेले आहे, पक्ष वाढीसाठी ते कोणत्याच कार्यात सहभागी नसतात, त्यामुळे आपले अस्तित्व दाखवण्यासाठी प्रसिद्धी माध्यमासमोर पक्षविरोधी वक्तव्ये करुन लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा आटापीटा दिसतो. पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याबद्ल योग्य तो निर्णय घेतील, असेही लोंढे म्हणाले.