तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:46 IST2025-07-04T13:42:15+5:302025-07-04T13:46:04+5:30

Pratap Sarnaik News: यापुढे कोणत्याही परिस्थिती शालेय फेरी रद्द होणार नाही, याची दक्षता प्रत्येक आगार प्रमुखांनी घ्यावी, अशा सूचना प्रताप सरनाईक यांनी दिल्या.

as many as 5 lakh 21 thousand 354 students took advantage of the st bus pass directly to school scheme said pratap sarnaik | तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik News: १६ जूनपासून शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना  एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत. केवळ १५ दिवसात म्हणजे १६ जून ते ३० जूनपर्यंत तब्बल ५ लाख २१हजार ३५४ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जूनपासून सुरू झाल्या. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६ टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो.  या अंतर्गत १ लाख ६१ हजार २०४ विद्यार्थ्यांना त्यांच्या, त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी पास वितरित केले. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जातात. या अंतर्गत ३ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेत जाऊन पास वितरित करण्यात आले. यापूर्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत. आता विद्यार्थ्यांना पास साठी  रांगेत  ताटकळत  उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार  एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येत आहेत.

अभिनव योजनेचा लाभ लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना होत आहे

या संदर्भात १६ जूनपासून एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले होते. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना होत आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

दरम्यान, जून पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. लाखो विद्यार्थी एसटीच्या बसेसने शाळेला जातात. त्यांच्यासाठी हजारो शालेय फेऱ्या एसटीने सुरू केलेल्या आहेत. परंतु विविध कारणांनी काही फेऱ्या अचानक रद्द केल्या जातात, अशा तक्रारी शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून येत आहेत. विशेषतः आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना एकच बस फेरी उपलब्ध असल्याने. ती रद्द झाल्यास त्यांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे यापुढे प्रत्येक आगार प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शालेय फेरी कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत.

 

Web Title: as many as 5 lakh 21 thousand 354 students took advantage of the st bus pass directly to school scheme said pratap sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.