अमर शैलाप्रतिनिधी
पुणे-मुंबई प्रवास म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात ते खंडाळा घाटातील डोंगर, धबधबे आणि तितकीच भीतिदायक वाहतूक कोंडी! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळा घाटात अतिज्वलनशील प्रोपोलीन गॅसने भरलेला टँकर उलटल्याने सह्याद्रीच्या कुशीत वाहनांच्या अक्षरशः रांगा लागल्या. ही वाहतूक कोंडी सुटण्यास ४० तासांहून अधिकचा वेळ गेला. अनेकांना गाडीतच रात्र काढावी लागली. साहजिकच अशा घटनांना सामोरे जाण्यासाठी उपाययोजनांच्या चर्चेचे गुऱ्हाळ आता सुरू झाले आहे. ठरावीक अंतराने मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर अनुभवायला येणारे कोंडीचे हे नेहमीचे वास्तव आहे. अशा ‘ट्रॅफिक जॅम’वर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ‘मिसिंग लिंक’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे बघितले जात आहे. हा प्रकल्प आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनी तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या मार्गावरील खंडाळा एक्झिटपासून खोपोलीपर्यंतचा भाग जीवघेण्या वळणांचा आणि तीव्र उताराचा आहे. हाच भाग ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे. तीव्र वळणावर टँकर उलटण्याचे अथवा अपघातांचे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी ‘मिसिंग लिंक’च्या माध्यमातून लोणावळा आणि खंडाळा घाट टाळून थेट बोगदा तयार करण्यात आला आहे. या नवीन मार्गामुळे वळणावळणाच्या घाटातून जाण्याची गरज उरणार नाही.
ठळक वैशिष्ट्ये
- या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासाचे अंतर ६ कि.मी.ने कमी होईल. प्रवास वेळेत ३० मिनिटांची, तर इंधनाची दररोज सुमारे एक कोटी रुपयांची आर्थिक बचत अपेक्षित आहे.
- दोन भव्य बोगदे. मुख्य बोगदा ८.९२ कि.मी. लांबीचा असून तो लोणावळा तलावाच्या १८० मीटर खालून जातो. हे बोगदे आशियातील सर्वांत रुंद बोगदे ठरणार आहेत.
- खंडाळा घाटातील दरीवर ६५० मीटर लांबीचा आणि १८४ मीटर उंचीचा भव्य केबल स्टेड पूल उभारला जात आहे, जो स्थापत्यशास्त्राचा एक नमुना ठरेल.
असा होईल फायदा
नवा मार्ग थेट आणि रुंद असल्यामुळे टँकर उलटण्याचे किंवा दरडी कोसळण्याचे धोके अत्यल्प असतील. छोटा अपघात झाला तरी, लोणावळा आणि खंडाळा घाटातील सध्याचा पर्यायी मार्ग असेल.‘मिसिंग लिंक’ मार्ग सुरू झाल्यावर एक्स्प्रेस वेवर अवजड वाहनांसाठी नवी एसओपी लागू करण्यात येणार आहे. त्यातून अपघातांचे प्रमाण कमी होईल.
Web Summary : The 'Missing Link' project aims to bypass Lonavala Ghat's dangerous curves via tunnels, potentially saving 30 minutes of travel time and reducing accidents. Completion is targeted for May 1, 2026, promising safer, faster Pune-Mumbai travel.
Web Summary : 'मिसिंग लिंक' परियोजना का लक्ष्य सुरंगों के माध्यम से लोनावला घाट के खतरनाक मोड़ों को बायपास करना है, जिससे यात्रा के समय में 30 मिनट की बचत हो सकती है और दुर्घटनाओं में कमी आ सकती है। 1 मई, 2026 तक पूरा करने का लक्ष्य, सुरक्षित, तेज पुणे-मुंबई यात्रा का वादा।