अंतर्गत मूल्यमापन करताना मानसशास्त्राशी सांगड घाला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 04:50 AM2019-07-14T04:50:41+5:302019-07-14T04:52:24+5:30

मुळातच अंतर्गत मूल्यमापनाची व्याप्ती विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राशी निगडीत असावी अशी मूलभूत अपेक्षा आहे

Apply internal psychology while undergoing an internal evaluation | अंतर्गत मूल्यमापन करताना मानसशास्त्राशी सांगड घाला

अंतर्गत मूल्यमापन करताना मानसशास्त्राशी सांगड घाला

googlenewsNext

- निराद विनय जकातदार
मुळातच अंतर्गत मूल्यमापनाची व्याप्ती विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राशी निगडीत असावी अशी मूलभूत अपेक्षा आहे आणि त्या बाबतीत आपण अजूनही अनेक मैल मागे आहोत ही दुदैर्वी वस्तुस्थिती आहे. आपल्याकडे अंतर्गत मूल्यमापन म्हणजे हमखास गुण मिळवण्याचा सुलभ मार्ग आणि त्याचा ढाचाही तसाच आहे. म्हणजेच ‘अनुत्तीर्ण होणारच’ ह्या कॅटेगरीत मोडणारे उत्तीर्ण होतील व ‘हमखास स्कोर करणार’ ह्या कॅटेगरीतले अगदी शंभर टक्क्यांपर्यंत भिडून धन्य होतील. प्रत्येक वयाचा, स्तराचा विद्यार्थी स्वयंभू ,सर्जनशील, सृजनशील व नाविन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास घेणारा असावा हा अंतर्गत मूल्यमापनाचा मूळ उद्देश कुठेच सार्थ होताना दिसत नाही. अंतर्गत मूल्यमापन बंद करून पूर्णत: बाह्य मूल्यांकन ग्राह्य धरून कृतिपत्रिकेवर आधारित परीक्षा पद्धती सुरु केली म्हणजे विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यमापन झाले या भ्रमात बव्हंशी शिक्षण तज्ज्ञ वावरताना दिसतात. परंतु विद्यार्थ्यांना आनंददायी वाटेल, आपलीशी वाटेल अशी शिक्षण पद्धती आपण अजूनही देऊ शकत नाही, हे आपले दुर्दैवच आहे.
परदेशात अंतर्गत मूल्यमापनात जीवन जगण्यासाठी अथवा त्याचा आस्वाद घेण्यासाठी लागणाऱ्या काही मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात. कॅम्पिंग, हायकिंग, टेन्ट लिविंग, अलोन लिविंग अशा अनेक मार्गांनी मुलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातो. जोडीला म्युझिक, कुकिंग, स्पोर्ट्स, थ्रीडी पेंटिंग्स, हाऊस डेकॉरेटिंग, डिबेटिंग अशा कितीतरी विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांना सर्वांगसुंदर आयुष्यासाठी तयार केले जाते. प्रेरक मूल्ये जागृत करून उत्साही आयुष्य जगण्यासाठी साहाय्यभूत ठरू पाहणारी ही मूल्ये आपण अंतर्गत मूल्यमापनासाठी विचारात का नाही घेऊ शकत? बदल हवाय तो इथेच.. सकस, पोषक ,काळाच्या बरोबरीने वाटचाल करणारी शैक्षणिक दृष्टी अंगिकारायला हवी..म्हणजे मग मूल्यमापनही पडताळून पाहता येईल व ते अढळ अधिष्ठान निर्माण करेल.
( सौ. सु. गि. पाटील न्यू इंग्लिश स्कूल,भडगाव, जि. जळगाव..)
खरी गुणवत्ता समोर येईल
अंतर्गत गुणदानाची पद्धत बंद केल्यामुळे यावर्षी दहावीचा निकाल अगदी कमी लागला. निकाल जरी कमी लागला तरी ही पद्धत अतिशय योग्य अशीच आहे .कारण यामुळे विद्यार्थ्यांचे खरेखुरे गुण जगासमोर येतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची खरीखुरी बौद्धिक पात्रता समजते. शिक्षणाची योग्य अशी दिशा ठरवण्याचा पहिला मार्ग दहावी असतो व त्यानंतर बारावी असतो दहावीत योग्य पद्धतीने मिळालेले गुण हे त्या विद्यार्थ्यांची भविष्यातील दिशा ठरवतात.यासाठी दहावीच्या परीक्षेत अंतर्गत गुणदान करण्याच्या पद्धतीला थाराच देऊ नये असे ठामपणाने वाटते.
- धनाजी मारुती माने (तंत्रस्नेही शिक्षक),
इटकरे, ता. वाळवा जिल्हा- सांगली.
>गुणवत्तेकडे दुर्लक्ष नको
फक्त निकाल वाढविण्यासाठी या पद्धतीचा वापर होत असेल तर अंतर्गत गुण देवू नये. विद्यार्थी खºया अर्थाने अभ्यास करेल, अशी भूमिका शिक्षकांची असली पाहिजे. शाळेत जानेवारीत सराव परीक्षा घेवूनही अंतर्गत गुण देता येईल. त्यासाठी फक्त प्रात्यक्षिक घेण्याची गरज नाही. अंतर्गत गुण विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण अभ्यासावर आधारित असावेत
-प्रफुल्ल चात्रेश्वार , राजापेठ, हुडकेश्वर रोड, नागपूर.
>विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका
राज्य शिक्षण मंडळ व सीबीएसई यांच्यात तुलना करण्यास वाव मिळू नये असे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना कसे मिळेल. तसेच कॉपीमुक्त शिक्षण राबवून गुणवत्तेकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणे राज्य सरकारचे काम आहे. अंतर्गत गुणपध्दतीमुळे गुणांचा फुगवटा दिसतो. शिवाय गुणवत्तेकडे किती लक्ष दिले गेले हेच कळत नाही. शिक्षणाचा खेळखंडोबा करु नये हीच शासनकर्त्यांकडून अपेक्षा आहे.
- अनिल उत्तमराव साळुंखे, शिरोडी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद.
भविष्यात होईल तोटाच
ज्या विद्यार्थ्याना फुकटचे अन् मोघम गुण मिळतात त्याचा तोटा भविष्यात होतो. केवळ फुकटचे गुण मिळाल्याने गुणांचा फुगवटा दिसतो. असे विद्यार्थी अकरावी बारावीतही अडखळतात. त्यामुळे ही खैरात उपयोगाची नाही.
-महेंद्र प्रकाश वाघमारे, नांदेड.


गुणवत्तेचे काय?
अंतर्गत गुणदान न मिळाल्याने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत चार लाख विद्यार्थीॅ नापास झाले. म्हणून आता ती पध्दत सुरू केली तर नापासाचे प्रमाण कमी होईल पण गुणवत्तेचे काय? हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे. त्यासाठी पहिलीपासूनच केवळ वरच्या वर्गात ढकलण्यासाठी अंतर्गत गुणदान पध्दत आहे ती बंद करावी म्हणजे दहावीत विद्यार्थी गटांगळ्या खाणार नाही. अजूनही सरकारला ही पध्दत सुरू करावी असे वाटत असेल तर गुणवत्तेच्या कसोटीवरच ती सुरू करावी.
- सोमनाथ शंकर आनोसे, उरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे.
>समानतेसाठी आवश्यकच
अंतर्गत गुण रद्द केल्यामुळे यंदाच्या दहावीच्या निकालात मराठी भाषा विषयात विद्यार्थ्यांना बसलेला फटका उल्लेखनीय आहे. अंतर्गत गुण देणे म्हणजेच प्रात्यक्षिक परीक्षा देऊनच गुण देणे असे नव्हे का? आपले विचार, भावना, कल्पना भाषणातून, संवादातून व्यक्त करता यायला हवीत, हे विचारात घेवूनच नववी, दहावीच्या अभ्यासक्रमाची, उपक्रमाची रचना केलेली आहे. श्रुतलेखन, भाषण, संभाषण, संवाद इत्यादी क्षमता पडताळून पाहण्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा घेणे योग्यच राहिल. निव्वळ लेखी परीक्षेवर संपूर्ण मूल्यमापन करणे हे कितपत योग्य आहे? अंतर्गत गुण रद्द केल्यास सीबीएसइ, आयसीएससी बोर्डाच्या तुलनेत आपले विद्यार्थी मागे पडतील. यामध्ये समानता ठेवण्यासाठी तसेच सामान्य विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची संधी मिळण्यासाठी अंतर्गत गुण पद्धती पुन्हा सुरू करावी.
- रशीद सरवरसाब कासार,
माजी मुख्याध्यापक, मिनार उर्दू मा. विद्यालय - लातूर.
अंतर्गत गुणदान योग्यच
आजच्या स्पर्धात्मक युगात अंतर्गत मुल्यमापन महत्त्वाचे आहे. यामुळेच विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व खºया अर्थाने तयार होते. सीबीएससी, आयसीएससी बोर्डच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिले जातात. त्यामुळे त्यांची गुणात्मक टक्केवारी अधिक असते. प्रवेशावेळी आपल्या बोर्डाचे विद्यार्थी मागे पडतात. म्हणून अंतर्गत गुणदान पध्दत योग्यच आहे.
- - गुलाबराव पी . पाटील, अध्यक्ष - मुख्याध्यापक संघ, कल्याण.
>गुणदान
एकसमान असावे
सीबीएसई ,आयसीएसी विद्यार्थ्यांच्या तुलनेत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे गुण तुलनेत कमी पडले. आकारिक मूल्यमापन पद्धतीने आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचं धोरणाने राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडत आहेत.देश पातळीवर विविध स्पर्धा परीक्षा होत असतात.अशावेळी विविध बोर्डाचा वेगवेगळा अभ्यासक्रम असल्याने इयत्ता ११ वी किंवा इतर अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. त्यातच अंतर्गत गुण देण्याची पद्धत बंद केल्याने भाषा विषयाचा निकालावर परिणाम झाला. त्यासाठी सर्व बोडार्चे अंतर्गत गुणदान पद्धतीचे धोरण समान गरजेचे आहे.
-शशिकांत जाधव,
गणेश कॉम्लेक्स, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे.

>गुण द्यावेत,
खैरात नको
विद्यार्थी हा इयत्ता आठवीपर्यंत नापास होऊ नये आणि तो नववीतून दहावीत गेल्यानंतर सहजासहजी पास होऊ नये अशी दुहेरी भूमिका राज्य मंडळाने घेतली की काय? अशी शंका घ्यायला वाव आहे. कारण सध्याच्या मूल्यमापन पद्धतीमध्ये भाषा आणि समाजशास्त्र या विषयांना अंतर्गत गुणदान पद्धत बंद करून पेपर 100 गुणांचा करण्यात आला.याउलट मात्र सीबीएसई आणि आयसीएसई यासारख्या मंडळात अंतर्गत मापनातून गुणदान पद्धत सुरू आहे. तुलनेने राज्य मंडळातील विद्यार्थी निकालात बरेच मागे पडत असल्याचे दिसून येते .यात थोडा बदल करून अंतर्गत गुणदान पद्धतीत शाळांनी विद्यार्थ्यांना गुणांची खैरात न वाटता त्यावर अंकुश घालून वस्तुस्थिती पाहून गुणदान पध्दत चालू ठेवावी.
-चंद्रकांत दडमल (सहाय्यक शिक्षक), मांढळ, ता .कुही, जि. नागपूर.

>बंद केल्याने काही फरक पडत नाही
अंतर्गत गुणदान बंद केल्याने दहावीचा निकाल कमी लागल्याची ओरड सुरू आहे. पण जे विद्यार्थी पास झाले ते खºया अर्थाने गुणवान आहेत असे म्हणता येईल. वास्तविक केवळ भाषा विषयामध्ये अंतर्गत गुणदान बंद केले आहे. जे गुण दिले जात होते तेही मोघमपणे. बहुतेक शिक्षक हे विद्यार्थ्यामध्ये भेदभाव करत नाहीत. मुलगा हुशार असो वा नसो सर्वाना सरसकट गुण दिले जातात. शिक्षकांवरही संस्थाचालकांचा दबाव असतो. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. अशा पध्दतीने गुण मिळवणारे विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा वाढवून ठेवतात. आणि अकरावीपासून गटांगळ्या खायला लागतात. कदाचित आत्महत्यासारखे प्रकारही अवलंबतात. त्यामुळे असे फुकटचे गुण न दिलेलेच बरे.
-प्रा. राजेंद्र रुद्राप्पा कोरे,
जयसिंगपूर कॉलेज, जि. कोल्हापूर.
>विद्यार्थ्यांची ससेहोलपट थांबवा
यंदाचा राज्य बोर्डाचा निकाल प्रचंड घसरला. त्यामुळे सीबीएससी , आयसीएसई बोर्डाच्या तुलनेत राज्य बोर्डाच्या कमी मुलांना पहिल्या प्रवेश फेरीत स्थान मिळाले. आता सरकार पुन्हा गुणदानाचा विचार करत आहेत. मग सरकारने आधी घेतलेला निर्णय फसला असे म्हणावे लागेल. यामध्ये विद्यार्थी मात्र भरडले गेले. आता तरी सरकारने अंतर्गत गुणदान पद्धतीचा विचार गांभीर्याने करावा.
- पार्थ सतीश डोंगरे, आदित्य पार्क, हरी ओम नगर, मुलुंड (पू), मुंबई
>या शिक्षकांची उल्लेखनीय पत्रेही मिळाली.
देवेंद्र संतोष

Web Title: Apply internal psychology while undergoing an internal evaluation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.