ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 06:34 IST2025-09-28T06:32:52+5:302025-09-28T06:34:41+5:30
लातुरात ६३ गावांचा संपर्क तुटला, बेळसांगवीला पुराच्या पाण्याचा वेढा, तब्बल ९०० जण अडकले, बचावकार्य सुरू, सोलापूर जिल्ह्यातही पूरस्थिती कायम

ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
छत्रपती संभाजीनगर / मुंबई :पूरस्थिती आणि अतिवृष्टीने रडकुंडीला आलेल्या मराठवाड्याला शनिवारी पुन्हा अतिवृष्टीने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे नद्या-नाल्यांचे पूर ओसरत नाहीत तोच प्रकल्पांमधून विसर्ग सुरू झाल्याने अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती ओढवून जनजीवन विस्कळीत झाले आहे. लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव, बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी दिवसभर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांनाही पावसाने झोडपून काढले.
मराठवाड्यात शनिवारी १४१ मंडळाअंतर्गत येणाऱ्या २,८८० गावांना अतिवृष्टीचा फटका बसला. यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात किरकोळ, तर उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी दिवसभरात विभागात एकूण ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस लातुरात ७५.३ मिलिमीटर कोसळला.
शेतकऱ्यांना ‘निकष’मुक्त हातांनी मदत ! मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
जळगाव : अतिवृष्टीसह पूरस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचा प्रयत्न आहे. निकष व नियमांचा विचार न करता आणि त्यावर बोट न ठेवता नुकसानीची नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बोलताना शनिवारी जळगावच्या विमानतळावर दिली. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी अडचणी येणार नाहीत. टरबूज व काही पिकांसाठी मदतीची तरतूद नाही. सकारात्मक निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
सीना नदीला पुन्हा पुराची शक्यता
सोलापूर : अहिल्यानगरसह धाराशिव जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सीना नदीत १ लाख ४० हजार ४६२ क्यूसेक सर्ग करण्यात आला. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगलीहून नवी बचाव पथकेही आली. ५ दिवसांपूर्वी २ लाख क्यूसेक विसर्ग केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पूर आला होता.
९०० जण अडकले, ६३ गावांचा संपर्क तुटला
लातूर : चार तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीत शनिवारी ६३ गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक पुलांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जळकोटमधील तीन गावांना पुराच्या पाण्याने वेढले असून, बेळसांगवीचे जवळपास ९०० लोक अडकले आहेत. जनावरे वाहून गेली आहेत.
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये योग्य निर्णय घेऊ. ही वेळ राजकारण करण्याची नसून, शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची आहे.- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी घेऊन त्यांना कर्जमुक्त करावे. तातडीने हेक्टरी ५० हजारांची मदत द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किमान ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी. -उद्धव ठाकरे, उद्धवसेना पक्षप्रमुख