धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 21:06 IST2025-12-17T21:05:16+5:302025-12-17T21:06:21+5:30
Devendra Fadnavis, Maharashtra Politics: फडणवीस सरकारमधील विविध मंत्र्यांवर सातत्याने आरोप केले जात आहेत

धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
Devendra Fadnavis vs Anjali Damania: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या. राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना मंगळवारी एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले. त्यांना २ वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षाही ठोठवण्यात आली. आज बुधवारच्या दिवशी कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत शिक्षा रद्द करण्याची किंवा स्थगिती देण्याची विनंती केली. पण उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा, आमदारकीचा राजीनामा द्यावाच लागेल हे जवळपास निश्चित आहे. याचदरम्यान, कोकाटे यांच्याजागी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची पुन्हा मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक इशारा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज दिल्लीवारी केली. दिल्लीला मुंडे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. याच भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत दमानिया यांनी ट्विट केले. त्यांनी लिहिले, "ना खाउंगा, ना खाने दुंगा' म्हणणाऱ्या पक्षाचे अमित शहा, मला, म्हणजे भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या व्यक्तीला वेळ देत नाहीत. पण अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि आता धनंजय मुंडे यांना भेटण्याची वेळ देतात. यात काय ते समजून जा…. भाजपला काय बोलू…… शब्दच उरले नाहीत."
ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या पक्षाचे अमित शहा , मला, म्हणजे भ्रष्टाचारा विरोधात लढणाऱ्या व्यक्तिला वेळ देत नाहीत, पण अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, आणि आता धनंजय मुंडे यांना भेटण्याची वेळ देतात.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 17, 2025
ह्यात काय ते समजून जा….
भाजपला काय बोलू…… शब्दच उरले नाहीत
ज्या… pic.twitter.com/LEG0gYoFWx
धनंजय मुंडेच्या नावाने फडणवीसांना इशारा
"ज्या धनंजय मुंडेंवर- १) बीड बँक घोटाळ्याचे आरोप आहेत २) बंदूक राज आणल्याचे आरोप आहेत ३) Mahagenco मधून राख चोरल्याचे आरोप आहेत ४) आवदा कंपनीकडून खंडणी मागितल्याचे आरोप आहेत ५) कृषी घोटाळ्याचे आरोप आहेत ६) दहशत, बंदुकराज, गुंडाराज केल्याचे आरोप आहेत... आणि सगळ्यात किळसवाणे म्हणजे ज्या क्रूर पद्धतीने स्व. संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी करवून घेतली, त्या विकृत वाल्मिक कराडची उणीव भासते, असे म्हणणारे धनंजय मुंडे जर परत मंत्री म्हणून परत आले, तर या भाजपाचा बहिष्कार लोकांनी केला पाहिजे. जर फडणवीसांनी हे होऊ दिले, तर मी या जन्मी त्यांना माफ करणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.