“शरद पवारांची उंची खूप जास्त, बावनकुळेंनी शिकवायची गरज नाही”; अनिल देशमुखांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 14:31 IST2023-08-24T14:30:10+5:302023-08-24T14:31:43+5:30
Anil Deshmukh Vs Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंची उंची कमी आहे. प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीने पदाला शोभेल असेच वक्तव्य करायला हवे, असे अनिल देशमुखांनी म्हटले आहे.

“शरद पवारांची उंची खूप जास्त, बावनकुळेंनी शिकवायची गरज नाही”; अनिल देशमुखांचा पलटवार
Anil Deshmukh Vs Chandrashekhar Bawankule: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे पाहायला मिळत आहेत. शरद पवार राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करत असून, पक्षबांधणीवर भर देताना दिसत आहेत. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला अनिल देशमुख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार शरद पवार यांना दैवत मानतात. त्यामुळे त्यांचे फोटो लावतात. शरद पवार यांनी त्याच आमदारांच्या मतदारसंघात सभा घेऊन आपली उंची कमी करून घेऊ नये, या शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली होती. आमच्यापासून अनेक नेते दूर गेले, ते शरद पवारांना दैवत मानतात. पण शरद पवारांनी सूचना केल्या होत्या की, माझ्या फोटोचा वापर करू नये. त्याचे पालन त्यांनी केले पाहिजे, असे सांगताना अनिल देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली.
चंद्रशेखर बावनकुळेंनी अक्कल शिकवायची गरज नाही
बावनकुळे हे एका मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे. मूळातच बावनकुळे यांची उंची कमी आहे. मात्र एवढ्या मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीने पदाला शोभेल असेच वक्तव्य करायला हवे. शरद पवारांची उंची खूप जास्त आहे. शरद पवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी अक्कल शिकवण्याची गरज नाही, असा पलटवार अनिल देशमुख यांनी केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. पक्षातील काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्याबाबत आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केलेली आहे. अजित पवार हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पण त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मात्र शरद पवार हेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.