श्री स्वामी समर्थांच्या दरबारी संतप्त भक्तांनी पुजाऱ्याच्या कानशिलात लगावली; काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:46 IST2025-04-07T13:45:28+5:302025-04-07T13:46:53+5:30

नुकताच स्वामी प्रकट दिन साजरा झाला. त्यादिवशी अडीच लाख भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले.

Angry devotees beaten to Priest at the Shri Swami Samarth Mandir, Akkalkot, what happened? | श्री स्वामी समर्थांच्या दरबारी संतप्त भक्तांनी पुजाऱ्याच्या कानशिलात लगावली; काय घडलं?

श्री स्वामी समर्थांच्या दरबारी संतप्त भक्तांनी पुजाऱ्याच्या कानशिलात लगावली; काय घडलं?

सोलापूर - अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरातील एका पुजाऱ्याच्या आडमुठेपणामुळे भाविकांना विनाकारण मनस्ताप होत आहे. लक्ष्मी दर्शनाशिवाय ओट्यावरून दर्शन मिळणे अवघड बनले आहे. व्हीआयपी नेत्यांसमोर मात्र पुढे पुढे करतात. त्यामुळे काही संतप्त भक्तांनी त्या पुजाऱ्याच्या कानशि‍लात लगावल्याची चर्चा आहे.

नुकताच स्वामी प्रकट दिन साजरा झाला. त्यादिवशी अडीच लाख भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले. मंदिर समितीच्या कागदोपत्री नसलेल्या एका पुजाऱ्याने दिवसभर गाभाऱ्यासमोर ठाण मांडला होता. ओट्यावरील व्हीआयपी दर्शन रोखून धरले होते. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवून येणाऱ्या भाविकांना मनस्ताप होत असल्याचं चित्र समोर आले. किंबहुना शहराचे नाव खराब होत आहे. याबाबत मंदिर समितीने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे. आडकाठी आणणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भक्तांनी केली आहे.

कॅमेऱ्यात प्रकार कैद

मंदिरातील एका चांगल्या पुजार्‍याला बाजूला सारून दिखावा करणाऱ्या एका पुजाऱ्याने जणू श्रद्धेचा आणि भक्तीचा बाजारच मांडला आहे. त्या पुजाऱ्याची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. व्हीव्हीआयपी आले की लुडबुड करून दिखावा करणे हा विषय रोजचा चर्चेचा ठरला आहे. लक्ष्मी दर्शन अंती काही भक्तांना ओट्यावरून स्पेशल दर्शन घडवले जाते. दानपेटीत दक्षिणा टाकू इच्छिणाऱ्या भक्तांना ताटात रक्कम टाकण्यास भाग पाडले जाते. हा सर्व प्रकार मंदिरातील कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याची चौकशी झाल्यास अनेक गोष्टी समोर येतील आणि भाविकांना त्रास होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, स्वामी समर्थ महाराज यांचे दैनंदिन विधिवत पूजा, अर्चा करण्यासाठी मोहन पुजारी यांची मंदिर समितीच्या वतीने नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांना दरमहा ९ हजार रूपयांपर्यंत मानधन आहे मात्र तब्येतीच्या कारणामुळे ते सध्या मंदिरात येत नाहीत असं श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी म्हटलं आहे.

स्वामींच्या प्रकट दिनी ओटी समोरून स्वामी दर्शन घेत होतो, तेव्हा येथील एक पुजाऱ्याने ओट्यावरून दर्शन घेणाऱ्या व्हिआयपी भक्तांना बरेच वेळ रोखून धरले होते. अनेकांनी विनंती करूनही सोडत नव्हते. अरेरावी बोलणे, ओरडणे, भक्तांना त्रास देण्याचा प्रकार सुरू होता. तात्काळ मंदिर समितीने त्या पुजाऱ्याचा बंदोबस्त करावा - विनय देशमुख, पनवेल, स्वामी भक्त 
 

Web Title: Angry devotees beaten to Priest at the Shri Swami Samarth Mandir, Akkalkot, what happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.