... अन् चंद्रकांत पाटलांच्या मदतीला धावून आल्या पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 15:00 IST2019-12-12T14:59:29+5:302019-12-12T15:00:31+5:30
पंकजा यांनी ताकीद दिल्यानंतर उपस्थितांनी शांततेत चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे ऐकूण घेतले.

... अन् चंद्रकांत पाटलांच्या मदतीला धावून आल्या पंकजा मुंडे
मुंबई - दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांच्या मेळाव्यात भारतीय जनता पक्षात असलेले अंतर्गत मतभेद समोर आले. भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या भावनांना वाट करून दिल्यानंतर मेळाव्यात जमलेल्या श्रोत्यांनी घोषणाबाजी सुरू केली होती. त्यामुळे वातावरण तापले होते. मात्र यावर पंकजा यांनी नियंत्रण मिळवले.
यावेळी खडसे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच भाजपच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर अन् द्वेषभावना असल्याचे सांगत भाजप नेतृत्वावर हल्लाबोल केला. रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचे पराभव झाले नसून ते घडवून आणल्याचा दावा खडसे यांनी केला. त्यामुळे मेळाव्यात जमलेल्या लोकांमध्ये संताप होता.
दरम्यान एकनाथ खडसे यांच्या भाषणानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाषणा करणार होते. मात्र जमलेल्या लोकांमधील संताप ओळखून पंकजा मुंडे यांनी माईकचा ताबा घेत उपस्थितांना शांत राहण्याचा इशारा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलणार आहेत. ते बोलताना कोणीही कमेंट करणार नाही, अशी सक्त ताकीद त्यांनी उपस्थितांना दिली होती. पंकजा यांनी ताकीद दिल्यानंतर उपस्थितांनी शांततेत चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे ऐकूण घेतले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी देखील सगळ्या बाबींवर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन दिले.