पत्नीच्या नाकाला ऑक्सिजन, पतीच्या हाती सिलिंडर; मायाक्का देवीच्या दर्शनासाठी वृद्ध दाम्पत्याचा संघर्षमय प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:40 IST2026-02-06T13:37:30+5:302026-02-06T13:40:57+5:30
पंढरपुरातील वृद्ध दाम्पत्याच्या श्रद्धेचा हृदयस्पर्शी क्षण

पत्नीच्या नाकाला ऑक्सिजन, पतीच्या हाती सिलिंडर; मायाक्का देवीच्या दर्शनासाठी वृद्ध दाम्पत्याचा संघर्षमय प्रवास
सुभाष कांबळे
अथणी : श्रद्धा असेल तर आजारही आडवा येत नाही, याचे जिवंत उदाहरण चिंचली येथील मायाक्का देवीच्या दर्शनावेळी पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील पंढरपूर येथील एक वृद्ध दाम्पत्य गंभीर श्वसनाच्या आजाराशी झुंज देत असतानाही ऑक्सिजन सिलिंडरच्या आधारावर मायाक्का देवीच्या दर्शनासाठी चिंचली येथे पोहोचले. या दुर्मीळ आणि हृदयस्पर्शी घटनेने उपस्थित भाविकांचे डोळे पाणावले होते.
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील ऐतिहासिक चिंचली मायाक्का देवीच्या यात्रेदरम्यान हा भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. पंढरपूर येथील संभाजी पाटील हे आपल्या पत्नी सखुबाई पाटील यांना घेऊन चिंचलीच्या मंदिरात आले होते. सखुबाई या श्वसनाच्या आजारामुळे त्रस्त असल्याने त्यांना ऑक्सिजन सिलिंडरद्वारे श्वास घ्यावा लागत होता. सिलिंडरची पाइप सखुबाई यांच्या नाकाला लावलेली होती व त्यांचे पती संभाजी यांनी सिलिंडर हातात पकडला होता. अशा अवस्थेत दोघे मंदिरात दाखल झाले.
पतीने प्रत्येक पावलावर आजारी पत्नीस आधार देत होते. वृद्ध पतीने पत्नीस काळजीपूर्वक मंदिरात नेले आणि देवीचे दर्शन घडविले. संभाजी आणि सखुबाई यांच्या पत्नी-पतीमधील हा परस्पर आधार व दृढ नाते पाहून भाविक भारावून गेले होते.
आठवडाभरापूर्वी सखुबाई यांना गंभीर आजारास सामोरे जावे लागले होते. मागील पाच ते सहा दिवस त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र, दरवर्षी देवीचे दर्शन घेणे, ही त्यांच्या कुटुंबाची परंपरा असल्याने, आरोग्याची पर्वा न करता त्यांनी देवीचे दर्शन घेण्याचा निर्धार केला.
डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी चिंचली गाठली आणि देवीसमोर कृतज्ञतेने प्रार्थना केली. दर्शनानंतर हे दाम्पत्य सुखरूपपणे आपल्या गावी पंढरपूरकडे रवाना झाले. आजारपणावर मात करत श्रद्धेच्या बळावर मंदिरापर्यंत पोहोचलेल्या या वृद्ध दाम्पत्याने भाविकांसमोर भक्ती, धैर्य आणि परस्पर साथ यांचा आदर्श उभा केला.