“भाजप, PM मोदी अन् CM फडणवीस हे प्रगतीचेच राजकारण करतात”; अमृतावहिनींचा टोला कुणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:08 IST2025-01-13T13:06:26+5:302025-01-13T13:08:24+5:30
Amruta Fadnavis News: शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचे अगदी योग्य शब्दांत विश्लेषण केले, याचा आनंद आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

“भाजप, PM मोदी अन् CM फडणवीस हे प्रगतीचेच राजकारण करतात”; अमृतावहिनींचा टोला कुणाला?
Amruta Fadnavis News: आताच्या घडीला राज्यात अनेक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण नवी वळणे घेत असून, नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहे. हे प्रकरण विरोधकांनी चांगलेच लावून धरले असून, आरोप-प्रत्यारोप तीव्र होत आहे. यातच ठाकरे गटाने दिलेला स्वबळाचा नारा, महाविकास आघाडीतील धुसपूस यांमुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. भाजपाचे शिर्डीत अधिवेशन झाले. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. यातच आता विविध घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
पत्रकारांशी बोलताना अमृता फडणवीस यांना राज्यातील परिस्थिती आणि वाढत जात असलेले जातीय राजकारण याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, देवेंद्रजी, भाजपा आणि पंतप्रधान मोदी हे प्रगतीचे राजकारण करतात. जातीय राजकारण न करणे आपल्या हातात आहे. त्यापेक्षा विकासाचे राजकारण करावे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
राजकारणातील कट्टर शत्रूही मित्र झाल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत
ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढवत आहे. विधानसभेला फटका बसल्यामुळे या गोष्टी केल्या जात आहेत, असे वाटते का, या प्रश्नावर बोलताना, मला वाटते की, आपल्या नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद आहेत. वैयक्तिक मनभेद कोणाचे नाहीत. त्यामुळेच राजकारणातील कट्टर शत्रूही मित्र झाल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. तर पक्के मित्र हे शत्रू झाल्याचे आपण पाहिले आहे. पुन्हा मित्र झाल्याचे पाहिले आहे, असे सूचक विधान अमृता फडणवीस यांनी केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले होते. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, शरद पवार दिग्गज नेते आहेत. त्यांचे विश्लेषण खूप चांगले असते. शरद पवारांनी अगदी योग्य विश्लेषण केले आहे, याचा मला आनंद आहे.