Amruta Fadanvis : अमृता फडणवीस संतापल्या, राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाणांना पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 16:23 IST2022-01-07T16:04:53+5:302022-01-07T16:23:09+5:30
Amruta Fadanvis : भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने रश्मी ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती.

Amruta Fadanvis : अमृता फडणवीस संतापल्या, राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाणांना पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस
मुंबई: भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने रश्मी ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. अमृता यांनी त्यांच्या ट्विटरवरुन ही माहिती दिली.
आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान,
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 7, 2022
ती आहे @NCPspeaks नेता विद्याहीन चव्हाण ,
आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल,तिने पसरविलेली सगळी विषारी घाण !@Vidyaspeaks मानहानी notice वाच आणि
सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण ! pic.twitter.com/Ydf7Z3aIEy
विद्या चव्हाण यांना पाठवलेल्या नोटीसचे फोटो ट्विटरवर शेअर करत अमृता फडणवीस यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली. 'आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीची विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतःला, मगच मिळेल तुला निर्वाण,'अशा शब्दात अमृता यांनी विद्या चव्हाण यांच्यावर पलटवार केला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या जितेन गजारिया याने रश्मी ठाकरेंना राबडी देवीची उपमा दिली होती. त्यानंतर शिवसेनेकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर पोलिसांनी जितेनला अटक केली. जितेन हा भाजपचा आयटी सेलचा प्रमुख असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्या टिप्पणीवरुन राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती.
काय म्हणाल्या विद्या चव्हाण ?
'भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने राबडीदेवीचे उदाहरण दिले असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. ती घरदार, चूलमूल सांभाळणारी संसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचे भाग्य मिळाले. बरं झाले देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये, असं विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या.