सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या छायाचित्रावर अमोल कोल्हे यांनी दिली अशी प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 06:33 IST2019-10-29T01:01:31+5:302019-10-29T06:33:45+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी पक्षाला यश मिळाल्यानंतर काही काळापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका छायाचित्राला प्रत्युत्तर दिले आहे

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या छायाचित्रावर अमोल कोल्हे यांनी दिली अशी प्रतिक्रिया
मुंबई - नुकत्याच आटोपलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी चांगली झाली नसली तरी राष्ट्रवादीला समाधानकारक यश मिळाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी पक्षाला यश मिळाल्यानंतर काही काळापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका छायाचित्राला प्रत्युत्तर दिले आहे.
या छायाचित्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची तुलना पंक्चर झालेल्या टायरशी करण्यात आली होती. तर अमोल कोल्हे या पंक्चर टायरमध्ये हवा भरताना दिसत होते. या छायाचित्रामधून अमोल कोल्हे यांच्या शिवस्वराज्य यात्रेची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवण्यात आली होती. दरम्यान, या छायाचित्राबाबत अमोल कोल्हे यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यात कोल्हे म्हणतात की,'' सहज फोन चाळताना ऑगस्ट महिन्यातली एक पोस्ट समोर आली..आणि सहज सुचलं ''फुंकर तीच असते जी मेणबत्ती विझवू शकते, अन निखारा चेतवू शकते! टीकेच्या वाऱ्याने भेलकांडायचं की तेच वारं शिडात भरून घ्यायचं. आपलं आपण ठरवायचं!'' कदाचित त्यावेळी पोस्ट तयार करणारा "गोवर्धन" उचलण्याची गोष्ट विसरला असावा. महाराष्ट्रात "शरदचंद्रजी पवार" नावाचा झंझावात आला अन (पोस्ट टाकणाऱ्या व त्यावर हसणाऱ्यांना) पंक्चर वाटणारी गाडी 105 च्या स्पीडने सुसाट निघाली.'' अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी टोला लगावला आहे.
परिस्थिती प्रतिकूल असतानाही विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून 100 हून अधिक जागा मिळाल्या आहेत.