Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 09:42 IST2025-10-13T09:42:18+5:302025-10-13T09:42:56+5:30
Ambadas Danve And Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत, यासाठी महायुती सरकारने तीन वर्षांपूर्वी 'आनंदाचा शिधा' योजना सुरू केली होती. परंतु, राज्याच्या सध्याच्या आर्थिक चणचणीमुळे ही योजना आता कागदावरच राहिल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या तोंडावर ‘आनंदाचा शिधा’ योजनेचा लाभ मिळण्याची आशा होती. परंतु, या योजनेसाठी निधीच नसल्याने शासकीय पातळीवर काहीच हालचाल झाली नसल्याची माहिती समोर आली. याच दरम्यान आणखी एक योजना बंद झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे, निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. अंबादास दानवे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. कोणत्या योजना बंद केल्या याची यादीच सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. अमच्यातून गेलेले 'कटप्रमुख' मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील.. शिंदेंच्या या योजना बंद..
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 13, 2025
१.…
"सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. आमच्यातून गेलेले 'कटप्रमुख' मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील.. शिंदेंच्या या योजना बंद...
१. आनंदाचा शिधा- बंद!
२. माझी सुंदर शाळा - बंद!
३. १ रुपयात पीकविमा - बंद!
४. स्वच्छता मॉनिटर - बंद!
५. १ राज्य १ गणवेश - बंद!
६. लाडक्या भावाला अपरेंटीसशिप - बंद!
७. योजनादूत योजना - बंद!
८. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना - बंद!
योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू" असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.
अजित पवारांना ‘आनंदाचा शिधा’बाबत प्रश्न विचारण्यात आला. काही योजना चालू असतात, सगळ्याच कायम चालतात, असे नाही. त्या-त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल केले जातात. आता आनंदाचा शिधा ठराविक लोकांना मिळायचा. लाडकी बहीण योजनेचे पैसे जास्त लोकांना मिळतात. सगळ्या योजनांबाबत महायुती सरकार सकारात्मक आहे. काही योजना आल्यावर त्याचा उद्दिष्ट साध्य होत नसेल तर त्यामध्ये आपण बदल करत असतो. त्यानुसार आम्ही मार्ग काढत असतो. ही गोष्ट काही आजची नाही. देशाला, राज्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ही पद्धत आहे. खूप योजना याआधीही आल्या, काही बंद केल्या, काही योजनांमध्ये बदल केले, काही योजना आणखी लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने मार्ग काढला. त्याचप्रमाणे याही बद्दल आमचा मार्ग काढायचा प्रयत्न सुरू आहे, असे अजित पवार यांनी सांगितलं.