PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:08 IST2025-10-16T11:23:08+5:302025-10-16T12:08:46+5:30
एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या १० योजना बंद करण्यात आल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला.

PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
Eknath Shinde: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याच्या काळात सुरू करण्यात आलेल्या योजना बंद केल्या जात असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावत कोणतीही योजना बंद केली नसल्याचे म्हटलं आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या १० योजना बंद करण्यात आल्या आहेत. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा दावा केला असून बंद करण्यात आलेल्या योजनाची यादीच त्यांनी दिली. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी १७ सप्टेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या योजनांची सुरुवात केली होती. मात्र आता या योजना बंद करण्यात आल्याचे अंबादास दानवे म्हणाले.
याआधीही अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या आठ योजना बंद केल्याची यादी एक्स पोस्टमधून दिली होती. त्यानंतर आता आणखी दहा योजना गुंडाळल्याचे अंबादान दावने यांनी म्हटलं आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी अशा योजना सुरु कराव्या असं का नाही वाटलं असाही सवाल अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंना केला आहे.
काय म्हटलंय अंबादास दानवेंनी?
अंबादास दानवे यांनी एक्स पोस्टमध्ये बंद करण्यात आलेल्या योजनांची यादी दिली आहे.
या आणखी बंद योजना..
१. नमो महिला सशक्तीकरण योजना - बंद
२. नमो कामगार कल्याण योजना - बंद
३. नमो शेततळे अभियान - बंद
४. नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना - बंद
५. नमो ग्राम सचिवालय योजना - बंद
६. नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना - बंद
७. नमो दिव्यांग शक्ती योजना - बंद
८. नमो क्रीडा मैदान व उद्यान योजना - बंद
९. नमो शहर सौंदर्यीकरण योजना - बंद
१०. नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना - बंद
या आहेत एकनाथ शिंदे यांनी १७ सप्टेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त घोषित केलेल्या योजना! असो. विषय हा आहे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दोन जन्मदिवस शिंदेंनी (घटनाबाह्य) मुख्यमंत्री म्हणून साजरा केले. तेव्हा या कटप्रमुखांना अश्या योजना घोषित कराव्या वाटल्या नाहीत? का बरं? शिंदे गटाला 'महाशक्ती'ने बहुदा दैवत आणि देवघर बदलण्याच्याच अटींवर चिन्ह आणि नाव दिले होते, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.