"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:30 IST2025-12-08T18:27:07+5:302025-12-08T18:30:50+5:30
भास्कर जाधव पदासाठी कुठल्या पक्षात जाणारा व्यक्ती नाही, असं विधान अंबादास दानवे यांनी केले.

"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
Ambadas Danve: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकारण तापले असताना, विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातच अंतर्गत स्पर्धा असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अनुभवी आमदार भास्कर जाधव यांच्याऐवजी युवा आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव या पदासाठी पुढे येत असल्याची जोरदार चर्चा विधिमंडळात रंगली आहे. दुसरीकडे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनीही भास्करराव जाधव पदासाठी कुठल्या पक्षात जाणारा व्यक्ती नाही, असं म्हटलं आहे.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक वादापेक्षा सध्या विरोधी पक्षनेतेपदाच्या चर्चेने विधिमंडळात अधिक लक्ष वेधले आहे. अनुभवी आमदार भास्कर जाधव यांच्याऐवजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे नाव या पदासाठी पुढे येत असल्याची जोरदार चर्चा आहे. असं असताना, भास्कर जाधव यांनी आज थेट भूमिका स्पष्ट केली. त्यांनी केवळ सत्ताधाऱ्यांनाच आव्हान दिले नाही, तर विरोधी पक्षनेतेपदाची निवड न करण्यामागे सत्ताधाऱ्यांची भीती कारणीभूत असल्याचे सांगत सडेतोड टीका केली. तर अंबादास दानवे यांनीही भास्कर जाधव हे स्वाभीमानी, आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेले नेतृत्व आहे असं म्हटलं.
"या आणि जा असं म्हणण्याला काही अर्थ नाही. भास्कर जाधव कोणत्या खुर्चीसाठी किंवा पदासाठी इकडे तिकडे जाणारी व्यक्ती नाही. भास्कर जाधव हे स्वाभीमानी, आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेले नेतृत्व आहे. उदय सामंत यांच्यासारखे खुर्ची पाहून पळून गेलेल्यांपैकी भास्कर जाधव नाहीत, यावर माझे ठाम मत आहे," असं अंबादास दानवे म्हणाले.
आमदार भास्कर जाधव यांनीही थेट सत्ताधाऱ्यांवर आणि कायद्यातील तरतुदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधी पक्षनेतेपद जाहीर न करण्यामागे सत्ताधारी केवळ सदस्यसंख्येच्या १० टक्के असल्याचा निकष पुढे करत आहेत, यावर भास्कर जाधव यांनी तीव्र आक्षेप घेतला. "मी या विषयावर अनेकवेळा बोललो आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे लांबलचक भाषण मी ऐकले. परंतु, एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के असले पाहिजे असे जे खोटे सांगतात, त्यांना माझे आव्हान आहे, घटनेतील ती तरतूद दाखवा. तसे लेखी पत्र मी दिले आहे आणि त्यांच्याकडून उत्तर घेतले आहे. अशी अट कुठेही नाही," असे ठामपणे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले.
महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचे पत्र विधीमंडळ सचिवालयाला देण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेत्याची नेमणूक न करण्यामागे सत्ताधाऱ्यांची संकुचित वृत्ती आणि भीती असल्याचे सांगत भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली. विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा रंगल्यावर त्यांनीही याबाबत भाष्य केलं. "कोकणात ठाकरेंची शिवसेनाच चालेल. जर सरकारने आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद देण्याची तयारी दाखवली, तर त्यांच्यासाठी मी एका क्षणात पदाचा त्याग करेन," असेही भास्कर जाधव म्हणाले.