आराेपांचा जाळ; प्रत्याराेपांची राळ; भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये हमरीतुमरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 07:33 AM2021-09-21T07:33:01+5:302021-09-21T07:36:42+5:30

कोल्हापूरला जाऊ न दिल्याने सोमय्या यांनी कराडमध्येच पत्रकार परिषद घेतली आणि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाच लक्ष्य केले.

Allegation on each other in BJP-NCP on the issue of corruption | आराेपांचा जाळ; प्रत्याराेपांची राळ; भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये हमरीतुमरी

आराेपांचा जाळ; प्रत्याराेपांची राळ; भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये हमरीतुमरी

Next

मुंबई/पुणे/कराड : गणरायाचे मंगलमय वातावरणात विसर्जन झाले आणि लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी राज्यात भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली. भाजपचे नेते किरीट सोमय्या हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कोल्हापूरच्या मातीत येऊन शड्डू ठोकणार होते; परंतु कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी त्यांना भल्या सकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून कराड येथे उतरविले आणि त्यानंतर दिवसभर नेतेमंडळींच्या आरोपांच्या फैरी झडल्या.

कोल्हापूरला जाऊ न दिल्याने सोमय्या यांनी कराडमध्येच पत्रकार परिषद घेतली आणि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाच लक्ष्य केले. ठाकरे कुटुंबीयांच्या बेनामी संपत्तीची चौकशी होणे गरजेचे आहे. त्याची माहिती घेण्यासाठी आणि बेनामी मालमत्तेचा हिशेब करण्यासाठी लवकरच अलिबागला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडण्याची सूचना मला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी केली असून, या घोटाळ्याबाबत मंगळवारी ईडीकडे कागदपत्रे देणार आहे. महाराष्ट्राचे सरकार ठाकरे आणि पवार हे दोघे मिळून चालवितात. त्यामुळे तेच या सर्व घोटाळ्यांना जबाबदार आहेत. पुढच्या आठवड्यात मुश्रीफांचा आणखी एक घोटाळा समोर आणणार असल्याचे सोमय्या म्हणाले.

डांबून ठेवणाऱ्यांवर कारवाई करा!
जिल्हाधिकाऱ्यांनी  कोल्हापुरात प्रतिबंध केल्याचा आदेश पोलिसांनी मला दिला.  या आदेशात मला मुंबईतून बाहेर पडू देऊ नका असा उल्लेख नाही. मुंबईत मला घरात कोंडून ठेवून बाहेर दोनशे पोलीस तैनात होते. ठाकरे सरकारची ही ठोकशाही असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर मला धक्काबुक्की करण्यात आली, असा आरोप सोमय्या यांनी केला. 

मुश्रीफांना कोणतीही ऑफर नाही 
मुश्रीफांना भाजपमध्ये येण्याची कोणतीही ऑफर मी दिली नव्हती. त्यांनी नाटकं करणे बंद करावे. कुणालाही त्रास देण्याची आमची संस्कृती नाही. कारवाई झाल्याने आणि घोटाळे बाहेर पडू लागल्याने मुश्रीफांचा ड्रामा सुरू आहे. त्यांनी कायद्याची लढाई कायद्याने लढावी. आता काँग्रेस नेत्यांचेही घोटाळे बाहेर काढणार आहे. येत्या दोन दिवसांत काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात. अजित पवारांसोबत शपथ घेणे ही ‘कॅल्क्युलेटेड रिस्क’ होती. आता काँग्रेस नेत्यांचेही घोटाळे काढणार आहे.      - चंद्रकांत पाटील

पाटीलच सोमय्यांचे मास्टरमाईंड 
किरीट सोमय्या आपल्यावर करीत असलेल्या आरोपांमागचे मास्टरमाईंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. याच पाटील यांनी आपल्याला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती; पण मी त्यांना ‘पवार एके पवार’ असे सांगितले. सोमय्यांविरुद्ध १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचे मी आधीच जाहीर केले आहे. आता आणखी ५० कोटी रुपयांचा दावा ठोकणार आहे. चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यात (कोल्हापूर) भाजप झीरो झाला आहे. 

चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्यात येणार होते; पण अमित शहांच्या मैत्रीमुळे ते टिकले. सोमय्यांचा वापर पाटील माझ्याविरुद्ध करून घेत आहेत, त्यांनी मर्दासारखे लढावे.  - हसन मुश्रीफ

घटनेचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नाही
या संपूर्ण प्रकरणात शरद पवार यांच्या हस्तक्षेपाचा प्रश्न येत नाही. रविवारी कोल्हापूरमध्ये जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास जी परिस्थिती आली, त्याची माहिती त्यांनी गृहविभागाला दिली. दोन पक्ष समोरासमोर आले तर कदाचित जास्त संघर्ष निर्माण होऊ शकतो, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढली. 

सोमय्या यांना अटक केली नाही किंवा ताब्यात घेतले नाही. त्यांना कराड विश्रामगृहावर नेण्यात आले. तेथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. अशा घटना घडतात त्यावेळी वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना ब्रीफिंग देतात. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ब्रीफिंग दिले की नाही, याची माहिती मला नाही. रविवारच्या घटनेचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काहीही संबंध नाही. जो निर्णय घेतला तो गृहमंत्रालयाने घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कारवाई हे चुकीचे 
केंद्राच्या पाठिंब्यावर राज्यातील आघाडी सरकार खिळखिळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपांबाबत पुरावे असतील तर पोलीस किंवा तपास संस्थांना द्या. केंद्राच्या आदेशाने तसे करीत असाल तर राज्यात कायदा- सुव्यवस्था राखणे हे गृहखात्याचे काम आहे, मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. 
- खा. संजय राऊत, शिवसेना
 

Web Title: Allegation on each other in BJP-NCP on the issue of corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app