उत्तराखंडच्या दुर्घटनेत अडकलेले चारही भाविक सुरक्षित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 21:06 IST2025-08-06T21:05:56+5:302025-08-06T21:06:37+5:30
उत्तराखंडच्या दुर्घटनेत अडकलेले चारही भाविक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तराखंडच्या दुर्घटनेत अडकलेले चारही भाविक सुरक्षित!
सोलापूर: आम्ही सर्वजण सेफ, सुरक्षित आहोत, तीन जण वरती गंगोत्रीजवळ आहेत, मी खालच्या बाजूला फोन लावण्यासाठी आलो आहे, आम्ही सुरक्षित आहोत, आम्हाला जेवण व इतर सेवासुविधा वेळेवर मिळत आहेत, दोन ते तीन दिवसांनी आम्ही सोलापूरला येऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे त्या उत्तरखंड दुर्घटनेत अडकलेल्या सोलापूरच्या चार भाविकांनी.
ओम साई ट्रॅव्हल्समार्फत हरिद्वारहून प्रवास करणारे धीरज बगले, समर्थ दासरी, विठ्ठल पुजारी आणि मल्हारी धोटे हे चार पर्यटक सध्या संपर्काबाहेर होते. त्यासंदर्भातील माहिती जिल्हा प्रशासनाकडून कुटुंबियांना दिली होती. मात्र दुपारच्या सुमारास त्या चौघांमधील एकाने कुटुंबियांना संपर्क साधून संवाद केला. आम्ही चार जण सुखरूप असल्याचे सांगितले. दरम्यान, आज सकाळपासून जिल्हा प्रशासनाकडून त्या चौघांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न सुरू होते. “जखमींच्या यादीत या चार नागरिकांची नावे नसल्याने ते सुखरूप असावेत,” असा विश्वास खा. प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला होता. खा. प्रणिती शिंदे या डेहराडून येथील स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून अडकलेल्या पर्यटकांविषयी माहिती मिळवण्याचे प्रयत्न करीत होत्या. अखेर त्या प्रयत्नांना यश आले आहे. आता त्या चौघांना सुखरूप सोलापूरपर्यंत आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत.