अजितदादांच्या वाढदिवसाचा केक कापला, पेढे वाटले आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, जोरदार धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 17:36 IST2022-07-22T17:35:07+5:302022-07-22T17:36:00+5:30
Ajit Pawar, NCP: धुळ्यामध्ये अजित पवार यांचा वाढदिवस साजरा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये जोरदार वादावादी होऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

अजितदादांच्या वाढदिवसाचा केक कापला, पेढे वाटले आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, जोरदार धक्काबुक्की
धुळे - विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे कार्यकर्ते दादांचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत आहेत. दरम्यान, धुळ्यामध्ये अजित पवार यांचा वाढदिवस साजरा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये जोरदार वादावादी होऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा वाढदिवस शहरातील राष्ट्रवादी भवन येथे साजरा केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फटाके फोडून, केक कापून तसेच फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. मात्र अजितदादांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीने डोके वर काढले. दरम्यान, राष्ट्रवादी भवनाच्या बांधणीच्या श्रेयावरून माजी आमदार अनिल गोटे यांचे समर्थक आणि रणजित राजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये वादावादी झाली.
धुळेमधील राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय असलेल्या राष्ट्रवादी भवन या इमारतीचं नुतनीकरण अनिल गोटे यांच्याकडून श्रमदानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र हे काम सुरू असताना जिल्हाध्यक्षांना विश्वासात न घेता अनेक फेरबदल करण्यात आल्याचा आरोप करत रणजित राजे भोसले यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, त्यातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.