अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:41 IST2025-11-07T12:41:40+5:302025-11-07T13:41:12+5:30
पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना युटर्न घेतला आहे.

अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
Ajit Pawar on Parth Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित जमीन खरेदी व्यवहारामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पुणे परिसरातील महार वतनाच्या ४० एकर जमिनीच्या व्यवहारात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आणि आर्थिक अफरातफर केल्याचा थेट आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर या प्रकरणावरून थेट अजित पवारांना लक्ष्य केले आहे. १८०० कोटींच्या जमिनीचा व्यवहार केवळ ३०० कोटींमध्ये करून, नियमानुसार आवश्यक असलेली सुमारे २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी केवळ ५०० रुपये भरून चुकवली गेल्याचा हा गंभीर प्रकार आहे. या घोटाळ्याची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देऊन पुन्हा युटर्न घेतला आहे.
आता या प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाची आपल्याला कल्पना नव्हती असा दावा केला आहे. मात्र आदल्याच दिवशी अजित पवार यांनी तीन ते चार महिन्यांपूर्वी अशा पद्धतीचं काहीतरी सुरु असल्याचं माझ्या कानावर आलं होतं असं सांगितले होते. त्यामुळे आता अजित पवार यांनी युटर्न घेतल्याचे म्हटलं जात आहे. झी २४ तास सोबत बोलताना अजित पवार यांनी या प्रकरणात पार्थ पवार किंवा इतर कोणाशीही बोलणं झालेलं नसल्याचे म्हटलं.
"माझा या गोष्टीशी दुरान्वये संबंध नाही हे मी कालच सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमुळे आज सकाळापासून आमच्या आढावा बैठका आहेत ज्या ६ ते ७ वाजेपर्यंत सुरु असतील. त्यानंतर मी सांगणार आहे. इतर सर्व गोष्टी नियमाप्रमाणे करण्यास सांगितल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. चौकशी होत असून त्यातून सत्य बाहेर येईल. सत्य समोर आल्यानंतर कारवाईसंदर्भात निर्णय घेतला जाईल," असे अजित पवार म्हणाले.
यावेळी तुम्हाला याची कल्पना होती का? असं विचारण्यात आलं. यावर अजित पवार यांनी नकार दिला. "नाही, अजिबात नाही. मी नेहमी माझ्या सगळ्या लोकांना सांगतो की कोणतीही गोष्ट करताना कायद्याच्या, नियमाच्या, संविधानाच्या चौकटीत राहूनच करा. या प्रकरणात माझं कुणाशीही बोलणं झालेलं नाही," असंही अजित पवारांनी म्हटलं.