संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 03:36 PM2021-01-17T15:36:11+5:302021-01-17T15:37:08+5:30

Ajit Pawar : कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

Ajit Pawar Says will fight till the last Marathi village in the border area added in Maharashtra | संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही - अजित पवार

संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही - अजित पवार

Next
ठळक मुद्देआंदोलनात जखमी झालेल्या सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांबद्दलही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मुंबई : हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमा भागातील सर्व मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणे, हीच या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले. 

आजच्याच दिवशी, बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालीन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. त्यावेळी सीमाभागातील मराठी बांधवांवर व महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरु आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत समस्त मराठी बांधव सर्वशक्तीनिशी, एकजुटीने लढतील, असे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

याचबरोबर, संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर, 18 जानेवारी 1956 रोजी मुंबईत गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्राचे दहा सुपुत्र शहीद झाले, तर 250 हून अधिक जण जखमी झाले होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या त्या महाराष्ट्रवीरांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले आहे. याशिवाय, आंदोलनात जखमी झालेल्या सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांबद्दलही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा निर्धारही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना  विनम्र अभिवादन - मुख्यमंत्री
हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे अभिवादन केले. "महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन! सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग तसेच समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबीयांना मानाचा मुजरा!", असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. याशिवाय, कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हूतात्म्यांना विनम्र अभिवादन, असे दुसऱ्या एका ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 

हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही - एकनाथ शिंदे 
बेळगाव सीमा भागातील हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात दिलेले बलिदान कदापि वाया जाणार नाही, जोपर्यंत बेळगाव आणि सीमा भाग महाराष्ट्रात येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू. सीमावासीयांच्या लढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 
 

Web Title: Ajit Pawar Says will fight till the last Marathi village in the border area added in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.