"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 01:30 IST2025-05-03T01:30:26+5:302025-05-03T01:30:56+5:30

Ajit Pawar Chief Minister Post: नुकत्याच एका कार्यक्रमात अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले.

Ajit Pawar said even he wants to become chief minister but the time has not yet come in Mahayuti government | "मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?

"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?

Ajit Pawar Chief Minister Post: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार बसणार हे निश्चित होते. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी मुख्यमंत्री कोण होणार, यावर बरीच चर्चा रंगली होती. पण अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री राहतील, याबाबत कुणाचेही दुमत नव्हते. तिघांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतही अजितदादांनी मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असं आवर्जून सांगितल्याचं साऱ्यांनाच लक्षात आहे. पण नुकत्याच एका कार्यक्रमात अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले.

कुठे बोलताना मांडलं मत?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून १ ते ४ मे या काळात मुंबईच्या वरळीत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५ आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने हे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी राज्याला महिला मुख्यमंत्री मिळायला हवी, अशा आशयाचे मत मांडले. त्यांच्या मुद्द्याचा संदर्भ घेऊन बोलताना अजित पवार यांनी मत मांडले.

नेमके काय म्हणाले अजित पवार?

"१ मे रोजी जागतिक कामगार दिन हा उत्साहात साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला. अलीकडच्या काळात महिलांना संधी मिळायला हवी म्हणून आर्थिक सक्षम करण्याचा निर्णयही आम्ही घेतला. महाराष्ट्राला अद्याप महिला मुख्यमंत्री मिळालेला नाही. महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे असे राही भिडे म्हणाल्या. आपल्याला सगळ्यांना तसं वाटत असतं, पण शेवटी योग पण जुळून यावा लागतो. आता मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावंस पण कुठं जमतंय. कधी ना कधी तो योगही जुळून येईल, नाही असं नाही," असे शब्दांत अजित पवार यांनी आपल्या भावना मांडल्या.

अजित पवारांच्या या विधानावरून अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली. काहींनी याला 'मनातील खदखद' असेही नाव दिले. पण अजित पवार जे बोलले ते एका विषयाचा संदर्भ घेऊन बोलले होते. त्यामुळे यात कुठलाही नकारात्मक सूर दिसत नाही.

Web Title: Ajit Pawar said even he wants to become chief minister but the time has not yet come in Mahayuti government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.