"कार्यकर्ते बोलायला लागले तर..."; सुरेश धसांच्या 'त्या' विधानावर अजित पवारांनी फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 18:27 IST2025-01-28T17:58:40+5:302025-01-28T18:27:32+5:30

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांनी का निर्णय घ्यावा असं सुरेश धस यांनी म्हटल्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिला.

Ajit Pawar reacted to Suresh Dhas question about why the CM should take a decision regarding Dhananjay Munde resignation | "कार्यकर्ते बोलायला लागले तर..."; सुरेश धसांच्या 'त्या' विधानावर अजित पवारांनी फटकारलं

"कार्यकर्ते बोलायला लागले तर..."; सुरेश धसांच्या 'त्या' विधानावर अजित पवारांनी फटकारलं

Beed Sarpanch Murder Case: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातल्या राजकारण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले असून या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करत आहेत. मात्र पक्षातील वरिष्ठांकडून धनंजय मुंडे यांच्यावर विनाकारण आरोप करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं असून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाही तर अजित पवारांनी निर्णय घ्यावा असं म्हटलं. यावर आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सोमवारी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नसून अजित पवारच निर्णय घेतील असं म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांनी हे विधान केले. यानंतर माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरेश धस यांनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारला. त्यावर बोलताना सुरेश धस यांना काय वाटतं त्याच्याशी माझं काही घेणं देणं नसल्याचे अजित पवार म्हणाले.

"सुरेश धस यांना काय वाटतं त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. मी या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मी चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करुन महायुतीचे सरकार व्यवस्थित पुढे काम करावं. यामध्ये एकनाथ शिंदे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो. वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काय अंतच राहणार नाही. त्यासंदर्भात जी काही भूमिका असेल ती अमित शाह, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे सांगतील. हे बरोबर आहे ना," असं अजित पवार म्हणाले. 

आरोप झाल्यानंतर तुम्ही पण ७२ दिवस मंत्रीमंडळातून बाहेर होता असं पत्रकारांनी म्हणतात माझी गोष्ट वेगळी आहे असं म्हटलं. "माझ्या वेळेस जी काही घटना घडली त्यावेळे मला असह्य झालं म्हणून मी राजीनामा दिला. आता चौकशा सुरु आहेत. दोषी कुणीही असलं तरी त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. त्यावर कारवाई केली जाईल," असं अजित पवार म्हणाले.

आम्ही भाजपचे आहोत - सुरेश धस

"अजित पवार निर्णय घेतील आणि त्यांनीच निर्णय घ्यावा. या प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा काय संबंध? आमच्या पक्षाचे ते नाही आहेत. त्यांचा राजीनामा आम्ही घेऊ शकत नाही. त्यांच्या पक्षाचेच आमदार राजीनामा घेतला जावा म्हणत आहेत. पण अजित पवार घेत नाहीत. अजित पवारांनी घ्यायचं की नाही ठरवायचं आहे. आमचं जरा लांबचं नात आहे. आम्ही भाजपाचे आहोत," असं सुरेश धस म्हणाले.

Web Title: Ajit Pawar reacted to Suresh Dhas question about why the CM should take a decision regarding Dhananjay Munde resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.