विकासकामांना स्थगिती नको म्हणत अजितदादा मुख्यमंत्र्यांकडे, कॉंग्रेसवाले उपमुख्यमंत्र्यांकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 09:50 AM2022-07-19T09:50:52+5:302022-07-19T09:52:02+5:30

मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांना सांगितले की, लोकहिताच्या कोणत्याही निर्णयास स्थगिती दिलेली नाही.

ajit pawar meet cm eknath shinde congress leader to dcm devendra fadnavis for development works should not be suspended | विकासकामांना स्थगिती नको म्हणत अजितदादा मुख्यमंत्र्यांकडे, कॉंग्रेसवाले उपमुख्यमंत्र्यांकडे

विकासकामांना स्थगिती नको म्हणत अजितदादा मुख्यमंत्र्यांकडे, कॉंग्रेसवाले उपमुख्यमंत्र्यांकडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघातील विकासकामांसह आधीच्या सरकारने घेतलेल्या काही निर्णयांना नवीन सरकारने स्थगिती दिल्याने विकासकामांना स्थगिती देऊ नका, असे साकडे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले. 

काही निर्णय आपण बदलवत आहात, पण विकासकामांना स्थगिती देणे वा ते रद्द करणे योग्य नाही. त्याचा फटका मतदारसंघातील जनतेला बसतो अशी कैफियत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासमोर मांडली. या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांना सांगितले की, लोकहिताच्या कोणत्याही निर्णयास स्थगिती दिलेली नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षाच्या  शिष्टमंडळाने माझी भेट घेतली. सरसकट कामांपेक्षा आवश्यक असलेल्या कामांना आम्ही मान्यता देऊ. 

अगोदरच्या सरकारने शेवटच्या काळात बजेटची उपलब्धता न पाहता, बजेटपेक्षा पाच पटीने अधिक निधीचे वाटप केले. अर्थातच याबाबतचे निर्णय रद्द करावे लागतील. ते कायम ठेवता येणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले.

अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत द्या : काँग्रेसची मागणी   

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील अतिवृष्टीत मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देण्याची तसेच कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी ५० हजार रुपये तर बागायती शेतीसाठी हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, तसेच राज्य सरकारने वाढीव वीजदराला स्थगिती द्यावी, विकास योजना आणि विकासकामांना दिलेली स्थगितीही तत्काळ उठवावी, अशी मागणी केली. शिष्टमंडळात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, विश्वजित कदम यांचा समावेश होता.

Web Title: ajit pawar meet cm eknath shinde congress leader to dcm devendra fadnavis for development works should not be suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.