Ajit Pawar | "आमच्या काळात व्हायला हवं होतं, आम्हीही कमी पडलो"; अजित पवारांनी भरसभागृहात दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 18:08 IST2022-12-27T18:07:53+5:302022-12-27T18:08:25+5:30
अजित पवार इतर वेळी विरोधी पक्षावर तोफ डागताना दिसतात

Ajit Pawar | "आमच्या काळात व्हायला हवं होतं, आम्हीही कमी पडलो"; अजित पवारांनी भरसभागृहात दिली कबुली
Ajit Pawar, Winter Session at Nagpur: राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरात सुरू आहे. या अधिवेशनात पहिल्या दिवसापासूनच विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी पाहायला मिळत आहे. राज्यात अभूतपूर्व अशी बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. या गोष्टीला बरेच महिने झाले असले तरी या सरकारचे मात्र हे नागपूरातील पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडताना दिसत आहेत. पण तशातच, आज एक मुद्दा मांडत असताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भरसभागृहात "आम्हीही कमी पडलो" अशी जाहीर कबुली दिली.
"महाराष्ट्राताला जर नंबर वन करायचं असेल तर आपल्या राज्यात असलेले प्रकल्प इतर राज्यांत जाऊ नयेत यासाठी आपणच काही तरी केलं पाहिजे. काही प्रकल्प विदर्भात आले होते, पण कामगारांच्या आंदोलनामुळे, कामगार-उद्योजक यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हे प्रकल्प बंद पडले किंवा दुसरीकडे निघून गेले. विदर्भाबद्दल बोलायचे झाले तर नागपूर-चंद्रपूरातील प्रकल्पांची आपण माहिती घेतली पाहिजे, बुट्टीबोरीचा प्रकल्प किंवा आणखीही काही प्रकल्प होते. फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री असताना ते झाले नाही. नंतर आमचेही सरकार आले, पण आम्हीही ते प्रकल्प पूर्ण करू शकलो नाही. आमच्या काळात व्हायला हवं होतं. पण आम्हीही कमी पडलो," अशा शब्दांत अजित पवारांनी कबुली दिली आणि विदर्भाच्या विकासाबाबत भूमिका मांडली.
"आम्ही काही गोष्टीत कमी पडलो, मी फक्त तुम्हाला दोष देत नाही. तुम्ही पण कमी पडलात, आम्ही पण कमी पडलो. त्यात विदर्भाचा काय दोष? आपल्या सर्वांना विदर्भाने, महाराष्ट्राने निवडून दिलं आहे त्यामुळे त्याकडे लक्ष दिले पाहिजे. राज्याच्या भल्यासाठी आताच्या सरकारने नवीन योजना आखल्या पाहिजेत. राज्यात आलेले किंवा येणारे प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाहीत यासाठी योग्य ती उपाययोजनाही केली पाहिजे", अशा शब्दांत अजित पवार यांना सभागृहात आपले मत व्यक्त केले.