मुंबई - महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये मदतकार्य तातडीने व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी एका महिन्याच्या पगाराचा पूर्ण मोबदला जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्राद्वारे दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्या सहकारी मंत्र्यांसह पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत.शिवाय नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही सुनिल तटकरे म्हणाले.
दरम्यान शेतकरी, कामगार आणि सर्व सामान्य जनतेच्या दु:खाच्या कठीण काळात राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगतानाच आगामी काळात आणखीही मदत आणि दिलासा देणाऱ्या उपाययोजना जाहीर करण्यात येतील, असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.