श्रीनिवास पवारांच्या टीकेवरून अजित पवार गटाने थेट शरद पवारांनाच सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 14:57 IST2024-03-18T14:56:43+5:302024-03-18T14:57:45+5:30
बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता अजित पवारांचं कुटुंब आहे. अजित पवार हे आतल्या गाठीचे राजकारणी नाहीत असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

श्रीनिवास पवारांच्या टीकेवरून अजित पवार गटाने थेट शरद पवारांनाच सुनावले
अकोला - श्रीनिवास पवार हे आजपर्यंत कुठेही राजकीय क्षेत्रात दिसले नाहीत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी माझं कुटुंब माझ्यासोबत नसेल. पण बारामतीची जनता हेच माझे कुटुंब आहे असं म्हटलं होतं. ते वास्तव आहे. श्रीनिवास पवार काटेवाडीत जे काही बोलले, घरातीलच माणसं एकमेकांविरोधात उभं करण्याची ही जुनीच पद्धत आहे. सख्खा भाऊ विरोधात उभा केला तर आपण निवडणूक जिंकू शकतो असं वरिष्ठांना वाटत असेल तर हा त्यांच्या भ्रमाचा भोपळा आहे. तो कधीही फुटू शकतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता अजित पवारांचं कुटुंब आहे. अजित पवार हे आतल्या गाठीचे राजकारणी नाहीत. त्यांना डाव कपट जमत नाही. त्यांना घेरणे सोप्पे असेल असं वाटत असेल पण हा अभिमन्यू चक्रव्यूहातून बाहेर पडून रणांगण मारेल. स्वत:च्या सख्ख्या भावाला उभं करण्याचा हा कुटील डाव आहे. जाणीवपूर्वक बारामतीकरांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण करण्यात येते. पण बारामतीकर खूप जागरुक आहेत. अजितदादांच्या मार्गदर्शनात सुनेत्रा पवार लाखोंच्या मताधिक्यांनी जिंकतील असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत श्रीनिवास पवार इतके दिवस का बोलले नाहीत, भावनिक विषय काढून जाणीवपूर्वक द्विधा मनस्थिती बारामतीकरांवर करू नका. भावनिक वातावरण तुम्ही निर्माण करतायेत. २०१४ ला न मागता भाजपाला तुम्ही पाठिंबा दिला, २०१९ ला भाजपासोबत बोलणी तुम्ही करायची आणि आता जर कुणी भूमिका घेतली असेल तर आरोपीच्या पिंजऱ्यात अजितदादांना का उभे करायचे? अजित पवारांसोबत आम्ही वैचारिक सोबत आहोत. तुम्ही इतक्या प्रतिष्ठेची ही निवडणूक करणार असाल तर रात्रीचा दिवस करून आम्ही सुनेत्रा पवारांना या जागेवर विजयी करून दाखवू असंही मिटकरींनी बजावलं आहे.