'नाना पटोलेंचं विधान हास्यास्पद', पाठीत सुरा खुपसण्याच्या वक्तव्यावर अजित पवारांचा पलटवार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 12:07 IST2022-05-12T12:07:06+5:302022-05-12T12:07:40+5:30
स्थानिक पातळीवरील निवडणुकीवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद आता चिघळताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

'नाना पटोलेंचं विधान हास्यास्पद', पाठीत सुरा खुपसण्याच्या वक्तव्यावर अजित पवारांचा पलटवार!
मुंबई-
स्थानिक पातळीवरील निवडणुकीवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद आता चिघळताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही कधीच पाठीत खंजीर खुपसला किंवा तलवार खुपसली असं म्हणत नाही. नाना पटोले यांनी केलेलं वक्तव्य हास्यास्पद आहे, असं अजित पवार म्हणाले.
मैत्रीचा हात पुढे करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसण्याचं काम करत आहे. आमच्याविरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू असून याचा जाब त्यांना आम्ही नक्कीच विचारू, असं नाना पटोले यांनी म्हटलं होतं. त्यावर अजित पवार यांनी आज खरमरीत शब्दात टीका केली आहे.
कुणी-कुणाच्या पाठीत सुरा खुपसला यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. नाना पटोले आधी काँग्रेसमध्ये होते. मग भाजपामध्ये गेले त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची असते. ती प्रत्येकाने झाकूनच ठेवावी. आम्ही कधी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा करत नाही. नाना पटोलेंनी केलेलं वक्तव्य हास्यास्पद आहे. त्यांच्या राजकीय पक्षांतराचा इतिहासही आपण पाहायला हवा, असं अजित पवार म्हणाले.
"हेडलाइन करण्यासाठी खंजीर खुपसला वगैरे बोलायला चांगलं वाटत असेल. पण आघाडीत तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत. राज्य स्तरावरील निर्णय राज्यातले नेते घेत असतात. जिल्ह्याच्या पातळीवर वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. तिथल्या गोष्टी नीट राहण्यासाठी नेत्यांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. आता काँग्रेसनंही अनेक ठिकाणी भाजपासोबत संधान बांधलं, मी त्याला फार महत्व देऊ इच्छित नाही. जबाबदार नेत्यांनी जबाबदारीनं बोलावं", असा सल्ला यावेळी अजित पवार यांनी नाना पटोले यांना दिला.