इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रिपदाची आदलाबदली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 00:54 IST2025-08-01T00:52:02+5:302025-08-01T00:54:35+5:30
महाराष्ट्राच्या विधिमंडळात रमी खेळताना सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती.

इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रिपदाची आदलाबदली!
महाराष्ट्राच्या विधिमंडळात रमी खेळताना सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत कोकाटे यांच्याबाबत चर्चा करून गुरुवारी रात्री उशीरा अंतिम निर्णय जाहीर केला. त्यानुसार, मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. तर, भरणे यांच्याकडील क्रीडा आणि अल्पसंख्यांक विकास खाती कोकाटे यांना देण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळातील श्री. दत्तात्रय भरणे व श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडील खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार कृषी खाते श्री. दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले असून क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औेकाफ हे खाते श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आले…
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 31, 2025
माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदाची आतपर्यंतची कारकीर्द खूपच वादग्रस्त आहे. सातत्याने शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधाने केल्याने ते टीकेचे धनी ठरले होते. अशातच पावसाळी अधिवेशनात विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ वायरल झाला आणि त्यांना पदावरून हटवण्यात यावे, अशा मागणीने चांगलाच जोर धरला.
दरम्यान, फडणवीस यांनी आज अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यासोबत माणिकराव कोकाटे यांच्या बाबत चर्चा केली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, कोकाटे यांचे मंत्रिपद टिकले असले तरी कृषिमंत्रीपद त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रेय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर भरणे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण खाते आता कोकाटे यांच्याकडे देण्यात आले. त्यामुळे पद सोडावे लागले असले तरी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश कायम ठेवण्यात आला आहे.