Ajit Pawar Convoy Stopped: अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला, नेमकं काय झालं..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 14:31 IST2022-07-15T14:30:54+5:302022-07-15T14:31:39+5:30
Ajit Pawar Convoy Stopped: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अजित पवार आले होते, यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवत जोरदार घोषणाबाजी केली.

Ajit Pawar Convoy Stopped: अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला, नेमकं काय झालं..?
अहमदनगर: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांचा ताफा अडवल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. पवार आज अकोले तालुक्यातील अगस्ती साखर कारखाना निवडणूक प्रचारासाठी आले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. अजित पवारांनी सीताराम गायकर यांचा प्रचार करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
अजित पवारांचा ताफा अडवल्यामुळे पोलिसांनी शेतकरी नेते दशरथ सावंत यांना ताब्यात घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी सावंत यांना ताब्यात घेतल्याचाही निषेध केला आहे. ताफा अडवणारे शेतकरी मधुकर पिचड समर्थक असल्याची प्राथमिक माहिती आहे. अजित पवार यांना व्यासपीठावर जाऊन थेट सवाल करण्याचा इशारा दशरथ सावंत यांनी दिला होता, त्यामुळे पोलीसांनी सभेपूर्वीच सावंत यांना ताब्यात घेतले.
साखर कारखान्याची निवडणूक सुरू
जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका नेहमीच गाजतात. अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड यांच्या विरोधात गायकर यांनी रणशिंग फुंकले आहे. अजित पवार आज अकोले तालुक्यात ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार करणार आहेत. मात्र, ज्यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत, त्या सीताराम गायकर यांच्यावर पवारांनी कधीकाळी जहरी टीका केली होती.