रेल्वेनंतर आता बीडला विमानतळाची भेट; उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधिमंडळात घोषणा
By आनंद मोहरीर | Updated: March 17, 2025 19:17 IST2025-03-17T19:15:25+5:302025-03-17T19:17:13+5:30
Ajit Pawar Beed Airport : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्याची घोषणा केली आहे.

रेल्वेनंतर आता बीडला विमानतळाची भेट; उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधिमंडळात घोषणा
Ajit Pawar Beed Airport : गेल्या काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख हत्याकांडासह विविध गुन्हेगारी घटनांमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar Announces Beed Airport) बीडमध्ये भव्य विमानतळ उभारण्याची घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेचे स्वप्न पाहणाऱ्या बीडकरांना रेल्वेसह आता हक्काचे विमानतळही मिळणार आहे.
LIVE : विधानसभा सन २०२५-२६ अर्थसंकल्प सर्वसाधारण चर्चा थेट प्रक्षेपण https://t.co/VD2k6tp4ev
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 17, 2025
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी आज(17 मार्च 2025) रोजी विधिमंडळात बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्याची अधिकृत घोषणा केली. सततचा दुष्काळ आणि गुन्हेगारी घटनांमुळे मागे पडलेल्या बीड जिल्ह्यासाठी हा अतिशय महत्वाचा निर्णय ठरणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक दशकांपासून रेल्वेचे स्वप्न पाहणाऱ्या बीडकरांसाठी रेल्वेसह विमानतळाचेही स्वप्न सत्यात उतरणार आहे.
धनंजय मुंडेंनी मानले आभार
अजित पवारंच्या निर्णयाबद्दल माहिती देताना माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे म्हणाले की, "राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांनी आज विधिमंडळात बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्याची अधिकृत घोषणा केली. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल दादांचे आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार! बीड जिल्ह्यातील जनतेचे बहुप्रतिक्षित स्वप्न मूर्त स्वरूपात साकार होणार आहे!"
"जिल्हा प्रशासनाने विमानतळ उभारणीचा परिपूर्ण प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडे सादर केला होता, त्यामुळे या प्रकल्पाला आता गती मिळेल. रेल्वेप्रमाणेच विमानसेवेचे स्वप्न साकार होणार आहे आणि या ऐतिहासिक निर्णयामागे वेळोवेळी मागणी करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे. हा विकास प्रकल्प बीडच्या भविष्याची नवी दिशा ठरू शकेल. या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचा विकास वेगाने साधला जाईल असा विश्वास वाटतो!" अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी व्यक्त केली.