Imtiaz Jaleel: “कुणाच्या आजोबांच्या इच्छेसाठी नामांतर नाही, माझ्या ‘डेथ सर्टिफीकेट’वरही औरंगाबादच नाव हवं”
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 15:43 IST2022-07-06T15:43:29+5:302022-07-06T15:43:59+5:30
Imtiaz Jaleel: केवळ हिंदुत्व दाखवण्यासाठी व बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद नामांतराचा निर्णय घेतला, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.

Imtiaz Jaleel: “कुणाच्या आजोबांच्या इच्छेसाठी नामांतर नाही, माझ्या ‘डेथ सर्टिफीकेट’वरही औरंगाबादच नाव हवं”
औरंगाबाद: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले होते. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच आता एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी याविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा देत, कुणाच्या आजोबांच्या इच्छेसाठी नामांतर नाही, माझ्या ‘डेथ सर्टिफीकेट’वरही औरंगाबादचेच नाव हवे, असे ठणकावून सांगितले आहे.
इम्तियाज जलील यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, यावेळी काही महत्वाचे ठराव घेण्यात आले. या बैठकीत एमआयएम, राष्ट्रवादी, काँग्रेससह अनेक संघटनेच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. जगभरात औरंगाबाद शहराची ऐतिहासिक ओळख आहे. परंतु केवळ हिंदुत्व हा मुद्दा दाखवण्यासाठी व बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचे नामांतर होऊ देणार नाही. यासाठी कायदेशीर लढाई उभारली जाईल, तसेच गरज पडल्यास रस्त्यावर सुद्धा उतरू असा इशारा जलील यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला आमचा विरोध नाही
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला आमचा विरोध नाही, आम्ही त्यांचा आदर करतो, संभाजी महाराजांचे नाव द्यायचे असेल तर ते पुणे शहराला देऊन दाखवा, असे आव्हान जलील यांनी यावेळी बोलताना दिले. औरंगाबादच्या नामांतरावेळी आपण शांत राहिलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला नक्कीच विचारतील की, जेव्हा या शहराचे नामांतर होत होते, तेव्हा तुम्ही काय करत होता. त्यामुळे नामांतराला विरोध व्हायलाच हवा. माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला असून, मला मृत्यूही औरंगाबादमध्येच यायला हवा. माझ्या बर्थ सर्टिफीकेटवर औरंगाबाद आहे. तर डेथ सर्टिफीकेटवरही औरंगाबादच असायला हवे, असेही जलील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जाता जात यांनी खालच्या दर्जाचे राजकारण केले आहे. त्यांना बहूमत चाचणी सिद्ध करायची होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव त्यांना दिसत असल्याने त्यांनी जाता जाता हे वाईट राजकारण खेळले आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सांगू इच्छितो नावे बदलली तरी इतिहास कुणी बदलू शकत नाही. तुम्ही राजकारणाच्या खालच्या पातळीचे उदाहरण दिले आहे. फक्त नागरिकच ठरवू शकतात की औरंगाबाद शहराचे नाव हे काय असायला हवे. या विरोधात आम्ही आंदोलने करु, असा इशाराही जलील यांनी यावेळी दिला.