Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:10 IST2025-11-17T13:07:58+5:302025-11-17T13:10:34+5:30
AI Camera: मोखाडा तालुक्यातील वेगवेगळ्या भागात संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळी बिबट्याचे अनेकांना दर्शन घडले असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
रविंद्र साळवे
लोकमत न्यूज नेटवर्क
मोखाडा : तालुक्यातील वेगवेगळ्या भागात संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळी बिबट्याचे अनेकांना दर्शन घडले असून त्याने दुचाकीस्वारावर हल्ला केल्याची घटना देखील नुकतीच घडली. त्यामुळे तालुक्यातील नागरिक घाबरले आहेत. या पार्श्वभूमीवर बिबट्याची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून वनविभागाने वारघडपाडा येथे एआय तंत्रज्ञानाने सौरऊर्जेवर चालणाऱ्या कॅमेरासह सायरन बसवला आहे. तसेच वेगवेगळ्या भागात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्ती पथके निर्माण केली असून नागरिकांचे प्रबोधनही करण्यात येत आहे.
मोखाडा तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून बिबट्याने वेगवेगळ्या भागात धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या बकऱ्या, वासरे आणि कुत्रे फस्त केले आहेत. त्यातच बिबट्याचे रोजच दर्शन घडत असल्याने नागरिकांसह शेतावर वास्तव्यास असलेल्या लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात दहशत आहे. बिबट्याच्या वावराबाबत पाच ते सहा गावांमधून वनविभागाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने गावोगावी जाऊन बिबट्यापासून कसे रक्षण करायचे याबाबत, नागरिकांचे प्रबोधन सुरू केले आहे.
बिबट्याचा सततचा वावर असलेल्या वारघडपाड्याच्या पुढे एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला कॅमेरा बसवला आहे. त्याच्या माध्यमातून आता या प्राण्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती वन विभागाने दिली.
दिवसरात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त
वारघडपाडा येथे एआय तंत्रज्ञानाचा कॅमेरा व सायरन बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर दिवस-रात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्तही असणार आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा देखील आणला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या परवानगी नंतर तो लावण्यात येणार आहे. गावोगावी शाळांसह वाडीवस्तीवर कर्मचारी आणि नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून काही नागरीक बिबट्याच्या वावराचा फेक व्हिडीओ तयार करत असल्याचे दिसून येत आहे. त्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती मोखाड्याचे वनक्षेत्रपाल विनोद दळवी यांनी दिली.