Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 09:37 IST2025-06-20T09:36:35+5:302025-06-20T09:37:37+5:30

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली एअर होस्टेस रोशनी सोनघरे हिच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Ahmedabad plane crash, Hundreds join cabin crew member Roshni Songhare funeral | Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!

Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली एअर होस्टेस रोशनी सोनघरे (वय २७) हिच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी रामनगर परिसरातील शिवमंदिर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सात दिवसांनी रोशनीचे पार्थिव घरी आणण्यात आले. पार्थिव पाहताच आई राजश्रीसह कुटुंबाने हंबरडा फोडला. त्यांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

अहमदाबादहून १२ जूनला लंडनसाठी उड्डाण केलेल्या विमानाला अपघात झाला. यात क्रू मेंबर रोशनी हिचा मृत्यू झाला होता. एकूण २७० जणांना अपघातात प्राण गमवावे लागले. घटनेची माहिती मिळताच रोशनीचे वडील राजेंद्र आणि भाऊ विघ्नेश हे अहमदाबादला रवाना झाले होते. मृतदेह जळून खाक झाल्याने मृतांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांची डीएनए चाचणी करण्यात येत होती. रोशनीच्या मृतदेहाची ओळख पटवायला सात दिवसांचा कालावधी लागला. बुधवारी ओळख पटवून तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी रात्री रोशनीचे पार्थिव एअर इंडियाच्या विशेष विमानातून मुंबई विमानतळावर आणण्यात आले. गुरुवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास रोशनीचे पार्थिव डोंबिवलीतील घरी आणले गेले. यावेळी कुटुंबीयांना शोक अनावर झाला. यावेळी एअर इंडियाच्या व्हाइस प्रेसिडेंट आणि केबिन क्रू हेड एन. जे. जुली आणि टाटा सन्सचे सीएफओ सौरभ अगरवाल यांच्यासह सहकारी उपस्थित होते. 

...त्याआधीच रोशनीवर काळाचा घाला 
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रोशनीने एअर होस्टेस होण्याचे स्वप्न जिद्द, मेहनतीने पूर्ण केले होते. लवकरच ती बोहल्यावर चढणार होती. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिचा साखरपुडा होणार होता; तर फेब्रुवारी-मार्चमध्ये लग्न होणार होते. त्यासाठी हॉलची शोधाशोध सुरू होती; पण त्याआधीच रोशनीवर काळाने घाला घातला.  

Web Title: Ahmedabad plane crash, Hundreds join cabin crew member Roshni Songhare funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.