विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 23:48 IST2025-06-14T23:47:41+5:302025-06-14T23:48:37+5:30
Ahmedabad Air India plane crash : विमान अपघातातून एक ब्रिटीश नागरिक सुखरूप बचावला आहे. याचबरोबर एवढ्या प्रचंड आगीत भगवदगीता आणि कृष्णाची मूर्ती सहीसलामत सापडली आहे.

विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
अहमदाबादमधीलएअर इंडियाच्या विमान अपघातात आतापर्यंत २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. पैकी १२ जणांचे डीएनए नातेवाईकांशी जुळले असून पहिला मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या विमान अपघातातून एक ब्रिटीश नागरिक सुखरूप बचावला आहे. याचबरोबर एवढ्या प्रचंड आगीत भगवदगीता आणि कृष्णाची मूर्ती सहीसलामत सापडली आहे. या दोन्ही वस्तू या पनवेलच्या लेकीच्या असल्याची मोठी शक्यता समोर येत आहे.
या विमानात पनवेल न्हावा येथील एयर होस्टेस मैथिली पाटील ही देखील होती. एअर इंडियाची ती क्रू मेंबर होती. एअर इंडियाच्या या विमानात बहुतांश क्रू मेंबर हे महाराष्ट्रातीलच होते. यापैकीच एक मैथिली होती. तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार विमान अपघातानंतर सहीसलामत सापडलेली भगवदगीता आणि बाळकृष्णाची मूर्ती ही तिची असण्याची दाट शक्यता आहे.
मैथिलीच्या वडिलांनी आपली मुलगी कृष्णभक्त असल्याचे सांगितले आहे. श्री कृष्णाची भक्त असणारी मैथिली गेली. घरात कृष्णाची मूर्ती आणि सोबत पण, तिच्याकडे भगवत गीता देखील असायची, असे त्यांनी डोळ्यात अश्रू आणत सांगितले आहे. पप्पा एवढ्याच पगारात काय होईल आता मी बघेन, असे सांगत ती मला धीर द्यायची असेही ते म्हणाले आहेत.
विमानाचा अपघात झाल्याचे समजल्यावर मैथिलीची आई आणि इतर नातेवाईक अहमदाबादला गेले आहेत. परंतू, तिथे कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचे मैथिलीच्या छोट्या बहिणीने आरोप केले आहेत. ताई आम्हाला नेहमी प्रत्येक गोष्ट सांगायची, यावेळी देखील तिने सर्व सांगितले होते. मला ती नेहमी तुझी नोकरी सुरक्षित आहे, असे सांगायची. पण आता नको तेच झाले, असे तिने म्हटले.