कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता, शेतीत गुंतवता का? कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 09:40 IST2025-04-05T09:14:25+5:302025-04-05T09:40:03+5:30
कर्जमाफीवरुन प्रश्न विचारता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले.

कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता, शेतीत गुंतवता का? कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुनावलं
Agriculture Minister Manikrao Kokate on Loan Waiver: राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानावर बरीच टीका झाली. सगळी सोंग करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही, शेतकऱ्यांनी ३१ मार्च पूर्वी पीककर्जाचे पैसे भरा, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या विधानावरुन अजित पवारांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता कर्जमाफीबाबत विचारताच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले. कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचे तुम्ही काय करता असा उलट सवाल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला. कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता असेही कृषीमंत्री म्हणाले.
बारामतीमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन विधान केलं होतं. माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफीबद्दल ऐकलं का? कर्जमाफीसारखी सध्या तरी आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह कर्जदारांनी ३१ मार्चपूर्वी बँकांमध्ये कर्जाची परतफेड करा, असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता शेतकरी एक रुपयाची तरी गुंतवणूक करतो का असा सवाल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या भेटीदरम्यान कृषीमंत्री कोकाटे यांनी कर्जमाफीबाबत हे विधान केलं.
"तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्याचे तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे त्याची. सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आहे आता तुम्हाला. शेतीच्या पाईपलाईनसाठी, सिंचनासाठी पैसे मिळतात. भांडवली गुंतवणूक सरकार देते. शेतकरी करतो का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे. मग साखरपुडे करा लग्न करा," असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले.
"कृषीमंत्र्यांची जबाबदारी फार मोठी असते. विदर्भ, मराठवाडा या भागांमध्ये नुकसान झाले आहे. नाशिक भागात कांदे, डाळिंबाचे नुकसान झाले आहे. या सगळ्यात कृषीमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आश्वस्त करणे गरजेचे होतं. पण हे सरकार संवेदना नसलेले आहे. या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत," अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.