राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासंदर्भात निवेदन देणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. यात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांचाही समावेश होता. या घटनेनंतर आज सुनील तटकरे यांनी धाराशीव येथे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी, जी घटना घडली, त्याचं मी समर्थन केलेलं नाही आणि करणारही नाही. मी कालय या संदर्भात बोललो आहे. त्यांना (सुरज चव्हाणांवर) आज राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलावले आहे. मी उद्या दिल्लीला चाललो आहे. तेथून आल्यानंतर त्यासंदर्भात आम्ही निर्णय घेऊ, असे तटकरे यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भातही भाष्य केले.
पुढे बोलताना तटकरे म्हणाले, "राहिला प्रश्न माणिकराव कोकाटे यांचा, तर त्यांच्याबद्दलही मी काल असं म्हणालो आणि आताही आपल्यासोबत म्हणतोय. चार-पाच वेळा माणिकरावांची वक्तव्ये शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अयोग्य पद्धतीची आली. पक्षाने गांभीर्याने त्याची नोंद घेतली. एक-दोनदा दादांनी त्यांना समजही दिली. पण कालचा जो व्हिडिओ बाहेर आला तो, नंतर माणिकरावांनी जरी त्यात काही खुलासा करण्याचा प्रयत्न केला असेल, तरी तोसुद्धा काही योग्य आहे, असं मला वाटत नाही."
"शेतकऱ्यांच्यावर आज जे काही संकट कोसळले आहे, एक तर सुरुवातीला मे महिन्यात पाऊस आला, यामुळे पेरण्या खोळंबल्या. परत ओढ लागली, परत दुसऱ्यांदा पेरण्या कराव्या लागल्या. शेतकरी संकटात असताना, कृषीमंत्री सारख्या महत्त्वाचा, संवेदनशील विभाग असणाऱ्या मंत्र्याने योग्य पद्धतीने सतत शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहिले पाहिजेत. त्यांच्याकडून जे घडलंय, ते अयोग्य आहे, असं मला नक्की वाटतं. पण शेवटी पक्षसुद्धा त्यांच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेईल," असेही तटकरे म्हणाले.