कृषीमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान; चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकारच्या वतीने मागितली शेतकऱ्यांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 05:41 IST2025-04-06T05:40:58+5:302025-04-06T05:41:36+5:30

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सरकारच्या वतीने क्षमायाचना करावी लागली.

Agriculture Minister Kokate controversial statement Chandrashekhar Bawankule apologizes to farmers on behalf of the government | कृषीमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान; चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकारच्या वतीने मागितली शेतकऱ्यांची माफी

कृषीमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान; चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकारच्या वतीने मागितली शेतकऱ्यांची माफी

नाशिक/नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्य सरकार विरोधकांकडून घेरले जात असतानाच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडे होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य शुक्रवारी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शनिवारी टीकेची झोड उठली आहे. खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सरकारच्या वतीने क्षमायाचना करावी लागली.

अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे काय बोलले ते माहीत नाही. मात्र, सरकार म्हणून मी शेतकऱ्यांची माफी मागतो. फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या मागे उभे आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे सांगितले.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी 'एक्स'वर कोकाटे यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ शेअर केला. त्यावर शनिवारी बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे नुकसान भरपाई दिला जाईल.

उपस्थित शेतकऱ्यांमध्ये माझे जवळचे मित्र होते. त्यांच्याशी मी थट्टामस्करीत बोललो. शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. शेतकऱ्यांवर कर्जाची वेळच येऊ नये. शेतकरी समृद्ध व संपन्न झाला पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. ज्या गोष्टी दाखवायच्या नाहीत त्या जाणीवपूर्वक दाखवतात.
माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री

काय म्हणाले कृषिमंत्री ?
कोकाटे यांनी माडसांगवी (जि. नाशिक) येथे नुकसान पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यातील संवाद पुढीलप्रमाणे..
एका शेतकऱ्याचा प्रश्न - उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कर्जमाफी होऊ शकत नाही. मग शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही?
कोकाटे - कर्ज घ्यायचं, पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट पाहायची. तोपर्यंत कर्ज भरायचं नाही. मला एक सांगा, आता येथे मीडिया आहे. मीडियासमोर असं बोलत नाही. कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात, त्या पैशाचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक करता का? शेतकरी म्हणतात, पीक विम्याचे पैसे पाहिजे, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा...

नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण करून मदत देणार
अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सरकारची आहे. एकही शेतकरी सुटू नये याची जबाबदारी अधिकाऱ्यांना दिलेली आहे आणि त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. नागपूर व अमरावती जिल्ह्यामधील नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. राज्यातसुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

Web Title: Agriculture Minister Kokate controversial statement Chandrashekhar Bawankule apologizes to farmers on behalf of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.