Maharashtra Political Crisis: मनसेचा उद्धव ठाकरेंना धक्का! ३० वर्षांची साथ सोडत शिवसैनिकांचा रामराम; ‘रिक्षावाला’ कमेंट झोंबली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 16:50 IST2022-07-07T16:42:46+5:302022-07-07T16:50:20+5:30
Maharashtra Political Crisis: मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईनंतर आता शेकडो शिवसैनिक पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: मनसेचा उद्धव ठाकरेंना धक्का! ३० वर्षांची साथ सोडत शिवसैनिकांचा रामराम; ‘रिक्षावाला’ कमेंट झोंबली
डोंबिवली: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर एकच खळबळ उडाली. शिवसेनेला हा मोठाच धक्का होता. अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली. शिवसेनेसाठी हा मोठा भूकंप होता. मात्र, आता मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईनंतर आता कल्याण-डोंबिलीतील शिवसैनिकांनी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख रिक्षावाला असा केल्याचे या कार्यकर्त्यांना झोंबल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांनी एक सामान्य रिक्षाचालक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्याने गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात 'रिक्षावाला' हा शब्द खूप गाजतोय. शिंदे गटाने ठाकरेंना दिलेला झटका ताजा असतानाच आता मनसेनेही शिवसेनेला धक्का दिला. शिवसेनेच्या संघटनेमधील तब्बल १२० रिक्षाचालकांनी मनसेच्या संघटनेत प्रवेश केला आहे.
उद्धव ठाकरे यांची ‘रिक्षावाला’ कमेंट झोंबली
डोंबिवलीत आता मनसेने शिवसेनेला झटका दिला आहे. शिवसेनेच्या संघटनेमधील तब्बल १२० रिक्षाचालकांनी मनसेच्या संघटनेत प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून व मनसे पदाधिकारी प्रदीप चौधरी यांच्या प्रयत्नातून ठाकुर्ली रेल्वे स्थानक शेजारील रिक्षा स्टँडचे नूतनीकरण करण्यात आले. याचे उद्घाटन वाहतूक सेनेचे सरचिटणीस अरिफभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहर संघटक योगेश पाटील, अरुण जांभळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका करताना त्यांचा रिक्षा चालक म्हणून उल्लेख केला होता. १२० रिक्षाचालक गेले ३० वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून या रिक्षा संघटनेत कार्यरत होते. हे सर्व राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत सामील झाले आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी दिली.