पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर महायुतीत धुसफूस, रायगडमध्ये भरत गोगावले नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 16:08 IST2025-01-19T16:06:15+5:302025-01-19T16:08:59+5:30

Bharat Gogawale News: रायगडचं पालकमंत्रिपद अदिती तटकरे यांना मिळाल्यानंतर पालकमंत्रिपदासाठी इच्छूक असलेले शिवसेना शिंदे गटातील मंत्री भरत गोगावले हे  नाराज झाले आहेत. तसेच त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

After the appointment of the Guardian Minister, there is chaos in the Mahayuti, Bharat Gogavale is upset in Raigad | पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर महायुतीत धुसफूस, रायगडमध्ये भरत गोगावले नाराज

पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर महायुतीत धुसफूस, रायगडमध्ये भरत गोगावले नाराज

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महिना लोटला तरी खोळंबलेल्या जिल्ह्यांच्या पाकमंत्र्यांच्या नियुक्त्या शनिवारी जाहीर करण्यात आल्या होत्या. नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर त्यावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, रायगडचं पालकमंत्रिपद अदिती तटकरे यांना मिळाल्यानंतर पालकमंत्रिपदासाठी इच्छूक असलेले शिवसेना शिंदे गटातील मंत्री भरत गोगावले हे  नाराज झाले आहेत. तसेच त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

रायगडचं पालकमंत्रिपद अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे यांना जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले म्हणाले की, हा आमच्या मनाच्या विरुद्ध घडलेला प्रकार आहे त्यामुळे आम्ही नाराज आहोत. घरामध्ये चुलीपर्यंत सामोरा जाणारा मी एकमेव आमदार आहे, याची कार्यकर्ते,  पदाधिकारी यांना खात्री आहे.  त्यामुळे त्यांना जी आपुलकी आहे, भावना आहे, ती त्यांनी व्यक्त केली आहे, असे भरत गोगावले  यांनी सांगितले. तसेच त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं. 

भरत गोगावले पुढे म्हणाले की, आम्ही सरकारमध्ये आहोत. आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सल्ला दिला आहे की, कुठे उद्रेक होईल, असं काही करायचं नाही. तसेच मी एकनाथ शिंदे यांची यासंदर्भात भेट घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, काल झालेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई आणि ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं होतं. त्याबरोबरच गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव, संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ, उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी, शंभुराज देसाई यांच्याकडे सातारा, संजय शिरसाट यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर, प्रताप सरनाईक यांच्याकडे धाराशिव, प्रकाश आबिटकर यांच्याकडे कोल्हापूरचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं होतं. तर आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचं सहपालकमंत्रिपद सोपवण्यात आलं होतं.  

Web Title: After the appointment of the Guardian Minister, there is chaos in the Mahayuti, Bharat Gogavale is upset in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.