पुण्याच्या रुपी बँकेनंतर राज्यातील आणखी एक बँक बंद होणार; ५ लाखांपर्यंत क्लेम करा- आरबीआय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 07:14 PM2022-09-22T19:14:56+5:302022-09-22T19:15:49+5:30

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या ११० वर्षांच्या रुपी बँकेला अखेर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात टाळे लागत आहे. आजच्याच दिवशी आरबीआयने आणखी एका बँकेचे लायसन रद्द केले आहे.

After Pune's rupee bank, RBI cancels the licence of The Laxmi Co-operative Bank Ltd, Solapur; depositors can claim up to Rs 5 lakhs | पुण्याच्या रुपी बँकेनंतर राज्यातील आणखी एक बँक बंद होणार; ५ लाखांपर्यंत क्लेम करा- आरबीआय

पुण्याच्या रुपी बँकेनंतर राज्यातील आणखी एक बँक बंद होणार; ५ लाखांपर्यंत क्लेम करा- आरबीआय

Next

पुण्याच्या रुपी कोऑपरेटीव्ह बँकेचा आजचा शेवटचा दिवस होता. आजपासून या बँकेला कायमचे टाळे ठोकण्यात येणार आहे. असे असताना आजच आरबीआयने महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेला टाळे ठोकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

रोखीचा तुटवडा निर्माण झाल्याने सोलापूरमधील लक्ष्मी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने १३ नोव्हेंबर रोजी प्रशासकाची नियुक्ती केली होती. यानंतर पाच लाखांच्या आतील रक्कम असलेल्या ग्राहकांना त्यांचे पैसे देण्यासाठी सव्वा महिन्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. यात १६ हजार ४०५ ठेवीदारांनी आपले क्लेम दाखल केले होते. यापैकी फेब्रुवारीमध्ये १२ हजार ९०० ठेवीदारांच्या खात्यात १४४ कोटी विमा रक्कम जमा करण्यात आली होती. 

बँकेवर प्रशासक आल्यानंतर २१६ कोटी ठेवी देणे बाकी होते. यातील २०२ कोटी ठेवी या पाच लाखांच्या आतील होत्या. यांना विमा संरक्षण असल्याने त्यांच्याकडून क्लेम दाखल करून घेतले. उर्वरित १४ कोटी ठेवी या पाच लाखांवरील होत्या. बँकेतील थकबाकीदारांकडून कर्जवसुली करून पाच लाखांवरील ठेवी परत करण्यात येत होत्या.


दरम्यान, आरबीआयने लक्ष्मी बँकेचे लायसन रद्द करत असल्याचे आज जाहीर केले आहे. यामुळे ही बँक आता कायमची बंद होणार आहे. यामुळे या बँकेच्या ठेवीदारांनी ५ लाखांच्या आतील रकमेसाठी क्लेम करावा, अशी सूचना आरबीआयने केली आहे. 

रुपी बँकही आजपासून बंद झाली...
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या ११० वर्षांच्या रुपी बँकेला अखेर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात टाळे लागत आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार गुरुवारपासून बँकेचे बँक म्हणून असलेले सर्व व्यवहार बंद होतील. राज्याचे सहकार खाते आता बँकेसंदर्भातील सर्व निर्णय घेणार आहे. मालमत्ता विकून बँकेची देणी भागवणे हा त्यातील प्रमुख भाग असेल. ठेव विमा महामंडळाने बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीवर जास्तीत जास्त ५ लाख रुपयांचा परतावा देण्यास सुरुवात केली. त्यानुसार तब्बल ७०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. रिझर्व्ह बँकेने १० ऑगस्ट २०२२ ला कायमची बंद करण्याची  २२ सप्टेंबर २०२२ ही तारीख निश्चित केली होती.
 

Web Title: After Pune's rupee bank, RBI cancels the licence of The Laxmi Co-operative Bank Ltd, Solapur; depositors can claim up to Rs 5 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.