मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:07 IST2025-12-30T10:05:57+5:302025-12-30T10:07:36+5:30
Shiv Sena Shinde Group Prakash Mahajan News: हिंदू म्हणून या सगळ्यात तुम्ही कुठे आहात? अशी विचारणा प्रकाश महाजन यांनी केली.

मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
Shiv Sena Shinde Group Prakash Mahajan News: दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अलीकडेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर लगेचच प्रकाश महाजन यांची शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती पत्र दिले. मनसे सोडल्यानंतर प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे यांच्यावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. तसेच भाजपावरही टीकास्त्र सोडले.
भाजपच्या घराला दार नाही, पण पहारेकरी आहेत. मी भाजपमध्ये गेलो नाही. कारण त्यांनी मला तब्बल तीन महिने ताटकळत ठेवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्यांनी आजवर भाजपावर कडाडून टीका केली, त्यांना पक्षात सन्मानाने घेतले जात आहे, पण माझ्यासारख्या व्यक्तीला प्रतीक्षा करावी लागली. मला असे वाटते की, आजच्या भाजपाला महाजन किंवा मुंडे कुटुंबाची गरज उरलेली नाही. मी वर्षापूर्वीच बाहेर पडलो आहे. सध्या भाजपामध्ये प्रमोद महाजन यांचा एक अंश शिल्लक आहे, त्यांच्याकडे तरी भाजपने नीट लक्ष दिले तर समाधान वाटेल, अशी खंत प्रकाश महाजन यांनी बोलून दाखवली.
विठ्ठलाने मला वीट फेकून मारली तर मी काय करणार?
मी पुंडलिक झालो होतो. पण विठ्ठलाने मला वीट फेकून मारली तर मी काय करणार? पुंडलिकाला कुणीतरी विठ्ठल पाहिजे असतो. आपला भक्त पुंडलिक असावा याची विठ्ठलाने काळजी घेतली पाहिजे आणि विठ्ठलाने तसे वागलेही पाहिजे ती पुंडलिकांची एकट्याची जबाबदारी नाही. छोट्या कार्यकर्त्याच्या निष्ठेवरच चर्चा असते. मोठ्या लोकांनी निष्ठा बदलली की समाज, विचार, समाजाची काळजी, देशाची काळजी असे ठरवले जाते. गरिबाने खाल्ले तर शेण मोठ्यांनी खाल्ले तर श्रावणी, या शब्दांत प्रकाश महाजन यांनी मन मोकळे केले.
...तर मग आमचा विठ्ठल का बदलू नये?
विठ्ठलाने भक्त बदलले, तर मग आम्ही आमचा विठ्ठल का बदलू नये? लहान कार्यकर्त्याने पक्ष बदलला की तो निष्ठावान नाही, तो गद्दार, मोठ्यांनी केले तर काय? हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दोन भाऊ लांब गेले. दोन भावांच्या मधे चंदू मामा उशिरा आले आधी रशीद मामू आले. हे राज ठाकरेंना मान्य आहे का? निष्ठावान बाळा नांदगावकर आहेत कुठे? शिवडीत एक जागा दिली, वरळीत एक जागा दिली. जी जागा हवी होती ती दिली नाही हे काय आम्हाला माहीत नाही का? हिंदू म्हणून या सगळ्यात तुम्ही कुठे आहात? अशी विचारणा प्रकाश महाजन यांनी केली.
दरम्यान, राजकारणात काम करायचे आहे, हिंदुत्वासाठी काम करत होतो. तीन महिने वाट पाहिली. कुणीतरी समजावून सांगेल असे वाटले होते. पाच वर्षे त्याच पक्षात होतो. राजीनामा देऊनही तीन महिने वाट पाहिली. प्रकाश महाजन भावनेवर जगणारा माणूस आहे. विठ्ठलासाठी आम्ही काय केले नाही? त्यांच्या नातवाची चाकरी करायचीही वाच्यता आम्ही जाहीरपणे केली होती. तेव्हाही लाजलो नाही. मग निष्ठा आम्हीच पाळायची का? निष्ठा बदलणार नाही म्हटले होते. विठ्ठलाने आम्हाला हमी दिली का? भक्ताला रुसायचा, रागवायचा हक्क आहे की नाही? की विठ्ठलानेच मारक्या म्हशीसारखे बघत बसायचे भक्ताकडे? असे एकमागून एक प्रश्न प्रकाश महाजन यांनी विचारले.