भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा, आरोपींविरोधात स्थानिकांचा उद्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:03 IST2025-02-24T18:02:44+5:302025-02-24T18:03:44+5:30

Malvan News: भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर देशभरात सुरू असलेल्या जल्लोषाला गालबोट लावणारा प्रकार मालवणमध्ये घडला. येथे एका परप्रांतिय भंगार व्यावसायिकाने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याने स्थानिक संतप्त झाले.

After India's victory, 'Pakistan Zindabad' slogans were raised in Malvan, locals erupted against the accused | भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा, आरोपींविरोधात स्थानिकांचा उद्रेक

भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा, आरोपींविरोधात स्थानिकांचा उद्रेक

सध्या सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर सहा विकेट्स राखून मात केली होती. या विजयासह भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं तिकीट जवळपास पक्कं केलं आहे. दरम्यान, भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर देशभरात सुरू असलेल्या जल्लोषाला गालबोट लावणारा प्रकार मालवणमध्ये घडला. येथे एका परप्रांतिय भंगार व्यावसायिकाने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याने स्थानिक संतप्त झाले. तसेच प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर आज स्थानिक प्रशासनाने या परप्रांतिय भंगार व्यावसायिकाच्या दुकानावर जेसीबीद्वारे तोडक कारवाई केली आहे. 

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार काल भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताचा विजय झाल्यानंतर मालवण  शहरातील आडवण भागात असलेल्या एका परप्रांतिय बांधकाम व्यावसायिकाने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. ही बाब उघडकीस आल्यानंतर सदर व्यक्तीने अरेरावी करत वाद घातला. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. तसेच याबाबत दोन आरोपींना पकडून स्थानिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. 

त्यानंतर आज सकाळी स्थानिकांनी मोर्चा काढत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच मालवणमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करून असलेल्या बांगलादेशी, परप्रांतियांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या आरोपीच्या भंगाराच्या दुकानावर जेसीबी चालवला. 

दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल स्थानिक आमदार निलेश राणे यांनीही घेतली असून, करावाई म्हणून सदर परप्रांतियाला जिल्ह्याबाहेर हाकलून देणार असल्याचे सांगितले. तसेच प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबत त्यांनी प्रशासनाचे आभारही मानले.  
 

Web Title: After India's victory, 'Pakistan Zindabad' slogans were raised in Malvan, locals erupted against the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.