After the Ayodhya Result: Kolhapur has set up a rally, a daily routine of the city. | Ayodhya Verdict : कोल्हापूरने उभारली सामंजस्याची गुढी, शहरातील दैनंदिन व्यवहार नियमित
Ayodhya Verdict : कोल्हापूरने उभारली सामंजस्याची गुढी, शहरातील दैनंदिन व्यवहार नियमित

ठळक मुद्देअयोध्या निकालानंतर : कोल्हापूरने उभारली सामंजस्याची गुढीशहरातील दैनंदिन व्यवहार नियमित

कोल्हापूर : अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही सर्वत्र अत्यंत सौहार्दाचे आणि एकोप्याचे वातावरण असून कोल्हापूर जिल्ह्याने सामंजस्याची गुढी उभारल्याचे चित्र या क्षणी आहे.

गेले चार -पाच दिवस पोलिस प्रशासनाकडून निकालाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी दक्षता घेण्यात आली होती. त्यासंदर्भातील वृत्तपत्रातील बातम्या वाचून लोकांमध्ये काहीशी भीती होती, परंतु प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर मात्र हा तणाव आणि भीती क्षणार्धात निघून गेली.

सकाळपासून शहरातील दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरु राहिले. शहरातील महाद्वार रोड, शिवाजी चौक, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी या प्रमुख भागातील दुकाने सुरु राहिले, व्यवहारही नियमितपणे सुरु होते. आज, शनिवार असल्यामुळे महाद्वार रोडवरील दुकाने बंद असतात, पण फिरत्या विक्रेत्यांची गर्दी कायम होती.

अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचीही रांग लागली होती. आज, तुळशी विवाह असल्यामुळे अनेक ठिकाणी लग्नासाठी उस, झेंडूची फुले आणि इतर साहित्य घेण्यासाठी लोकांची गर्दी होती. चौका चौकात उभे राहिलेले पोलिसच आज काहीतरी वेगळे असल्याचे जाणवून देत होते.

शनिवार असल्यामुळे सकाळची शाळाही नियमितपणे भरल्या. शहर वाहतूक करणारी केएमटी बसही रस्त्यावर धावत होती. कोठेही किचिंतसाही तणाव नव्हता. जणू आज काही वेगळे घडलेलेच नाही, असेच सगळीकडे वातावरण आहे.

कोल्हापूर ही शाहू महाराजांच्या विचारांवर पोसलेली पुरोगामी नगरी आहे. येथे धार्मिक ऐक्याचा बंध कायमच मजबूत आहे. त्यामुळेच शहरातील वातावरण सामंजस्याचे राहिले.


कोल्हापूरची जडण घडण राजश्री शाहू महाराजांच्या विचाराने झाली आहे. त्यामुळे या भूमीने कायमच सामाजिक सलोख्याला महत्व दिले आहे. अयोध्या निकालाचा सर्व समाज बांधवांनी आदर ठेवून सामंजस्याची परंपरा कायम राखली हेच कोल्हापूरचे वैशिष्ट्य आहे.
- संभाजीराजे छत्रपती,
खासदार, कोल्हापूर.न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करण्याची भूमिका सर्व मुस्लिम धर्मगुरुंनी घेतली होती. त्याला अनुसरुन अयोध्याच्या निकालाचे स्वागत करतो, कोण हरले आणि कोण जिंकले असा मुद्दा न करता सर्वांनीच या निकालाचा आदर राखावा, अशी आमची भूमिका आहे.
- गणी आजरेकर,
नेते, मुस्लिम समाज, कोल्हापूर.
 

Web Title: After the Ayodhya Result: Kolhapur has set up a rally, a daily routine of the city.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.