'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 08:54 IST2025-09-25T08:52:08+5:302025-09-25T08:54:01+5:30
Aaditya Thackeray Devendra Fadnavis: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक तडाखा शेतकऱ्यांना बसला असून, याच संदर्भात आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काही मागण्या केल्या आहेत.

'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
Maharashtra Flood CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीच्या तडाख्याने प्रचंड नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या घास ऐन दिवाळीच्या तोंडावरच माती कालवली गेली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत असून, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज्याच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या असून, पिकेही सडली आहेत. पूरपरिस्थितीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्याशिवाय मदत करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.
'शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची वेळ आलीये'
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या दुरावस्थेच्या संदर्भात मी आपणास कळवू इच्छितो की, मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर शेतातील मातीच वाहून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांचे जवळपास ५०% किंवा त्यापेक्षाही जास्त नुकसान झाले आहे. ही परिस्थिती अत्यंत दुःखद आहे आणि त्यावर त्वरित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे."
"आपण आपल्या भाषणात, राज्यातील जनतेला योग्य वेळ येताच कर्ज माफी करण्याचे आश्वासन दिले होते. आता ती वेळ आलेली आहे, आणि राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज आहे", अशी मागणी आदित्या ठाकरेंनी केली आहे.
"माझ्या माहितीप्रमाणे, आधी झालेल्या नैसर्गिक आपत्तींच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडे जवळपास १५,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. या थकबाकीचे वितरण लवकरात लवकर करण्याची ही अत्यंत आवश्यकता आहे", असेही आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना म्हणाले आहेत.
सरकारने तातडीने निर्णय घ्यावा
"माझ्या माहितीप्रमाणे, २, ३३९ कोटी रुपयांच्या निधीला केवळ मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात मदतीचे वितरण करण्यासाठी बराच कालावधी लागेल. या परिस्थितीत, शेतकऱ्यांना त्वरित मदत पुरवण्यासाठी आणि योग्य वेळेत त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा", असे आदित्य ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे.
"राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त झालेले असल्यामुळे नियमांनुसार पंचनाम्याची आवश्यकता नाही. सरसकट सर्व शेतकऱ्यांना मदत देणे, हे आपले कर्तव्य आहे. ज्याप्रकारचे नुकसान झालेले आहे. त्याप्रमाणे व कुठल्याही प्रकारचे निकषांमध्ये न अडकता शेतकऱ्यांना अपेक्षित आणि गरजेची असलेली मदत तात्काळ करण्यात यावी", असा मुद्दा आदित्य ठाकरेंनी सरकारकडे मांडला आहे.
"महोदय आपणास विनंती आहे की, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्वरित आणि प्रभावी पावले उचलावीत, जेणेकरून त्यांना योग्य वेळी मदत मिळू शकेल आणि त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल", अशी अपेक्षा आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली आहे.