राज्यातील सिंचनासाठी १५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देणार - जलसंपदामंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 06:43 IST2021-02-14T02:27:07+5:302021-02-14T06:43:57+5:30
jayant patil : राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जळगावात आले. शनिवारी सकाळी १० वाजता त्यांनी ‘लोकमत’च्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील शहर कार्यालयाला भेट दिली.

राज्यातील सिंचनासाठी १५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देणार - जलसंपदामंत्री
जळगाव : राज्यातील जलसिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी १५ हजार कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणार आहोत. त्याचा प्रस्ताव करून राज्यापालांच्या सूत्रानुसार त्याचे वाटप होईल व त्यातील वाटा तापीच्या प्रकल्पांमध्ये देणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जळगावात आले. शनिवारी सकाळी १० वाजता त्यांनी ‘लोकमत’च्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील शहर कार्यालयाला भेट दिली. ते म्हणाले की, काही प्रकल्पांत केंद्र सरकारचा मागील वर्षभरापासून हिस्सा आलेला नाही. कोरोनाच्या काळात निधी उपलब्ध नसल्याने राज्याचा वाटादेखील कमी आहे.
हा वाटा सध्या भरून काढत आहोत. मोठ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी अतिरिक्त निधी लागेल. हा १५ हजार कोटींचा अतिरिक्त निधी बाहेरून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यपाल यांनी ठरवून दिलेल्या सूत्रानुसारच निम्न तापी प्रकल्पाला हा वाटा मिळणार आहे. गोसेखुर्दमध्ये राज्याचा वाटा कमी आहे. सरकार मोठ्या प्रकल्पांना गती देत आहे. धुळे आणि नंदुरबारच्या २२ उपसासिंचन प्रकल्पांसाठी ११५ कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे.
कुऱ्हा वडोदा प्रकल्पासाठी साडेपाच कोटींचा प्रस्ताव आहे, असे त्यांनी सांगितले.
निष्ठावंत कार्यकर्त्यांना सांभाळणार
राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेबाबत ते म्हणाले की, खान्देश आणि विदर्भातील ८२ मतदारसंघात यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानुसार पुढील काळात मराठवाडा व कोकण भागांचा दौरा करणार आहे. यात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. अन्य पक्षांतील काही जणांचे राष्ट्रवादीत प्रवेश झाले. त्यानंतर काही ठिकाणी जुने निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. मात्र ही अडचण आम्ही नक्कीच सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.