संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 18:10 IST2025-09-29T18:09:51+5:302025-09-29T18:10:10+5:30
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचे गंभीर संकट आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असताना देखील एसटी महामंडळाच्या २५१ पैकी ३४ आगारातील आगरप्रमुख हे आपल्या कर्तव्यावर हजर नसल्याचे एका गोपनीय अहवालामध्ये निष्पन्न झाले. ही अत्यंत गंभीर बाब असून, बेजबाबदार वर्तन करुन आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या आगारप्रमुखांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. तसेच अशाप्रकारचे बेजबाबदार वर्तन भविष्यात खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक रस्ते बंद आहेत. पुलावर पाणी आले आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीची वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प झाली आहे. अनेक प्रवासी बसस्थानकावर अडकून पडले आहेत. अशा गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या मुख्यालयात हजर राहून आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडण्याऐवजी काही आगारप्रमुख कर्तव्यावर गैरहजर असल्याचे दिसून आले आहे. या आगारप्रमुखांनी परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता अत्यंत बेजबाबदार वर्तन केले आहे. अशाप्रकारे आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या आगारप्रमुखांना संबंधित प्रादेशिक व्यवस्थापक यांनी कारणे दाखवा नोटीस तातडीने बजावली पाहिजे. त्यामध्ये त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर प्रमादीय कारवाई करण्यात येईल. तसेच हे आगारप्रमुख ज्या विभाग नियंत्रकांच्या अखत्यारित काम करतात, त्या विभाग नियंत्रकांना देखील याबाबत विचारणा केली जाणार आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.
आगारप्रमुख हा एसटी प्रशासनाचा मुख्य घटक आहे. त्याच्या हाताखाली शेकडो कर्मचारी काम करत असतात. तो ज्या आगारात कार्यरत असतो, तेथे अनेक बसेस रात्रपाळीला मुक्कामी असतात. तसेच लाखो रुपये किमतीचे ऑइल, इंधन व इतर सुटे भाग तिथे असतात. याबरोबरच तिकीटविक्री मधून आलेली मोठी रक्कम देखील आगारात ठेवण्यात आलेली असते. अशा परिस्थितीमध्ये एक पालक म्हणून आगारप्रमुखांवर मोठी जबाबदारी असते. त्याने आगारात दररोज उपस्थित राहून या सर्वांना मार्गदर्शन करणे व त्यांच्यावर अंकुश ठेवणे गरजेचे असते. परंतु काही आगारप्रमुख हे आपल्या आगारात उपस्थित नसल्याचे सुरक्षा व दक्षता खात्याच्या गोपनीय अहवालात स्पष्ट झाले होते. कर्तव्यात कसूर करून बेजबाबदार वर्तन करणाऱ्या अशा आगरप्रमुखांच्यावर प्रशासन लवकरच कारवाई करेल. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत अशी दक्षता एसटी प्रशासनाने घ्यावी असे निर्देश सरनाईक यांनी दिले.