RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 17:28 IST2025-09-16T17:25:32+5:302025-09-16T17:28:41+5:30
Narendra Modi News: भारताचे पंतप्रधान बुधवार १७ सप्टेंबर रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करणात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि संघातील नियमानुसार नरेंद्र मोदी हे आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन राजकीय निवृत्ती स्वीकारणार, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.

RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
मुंबई - भारताचे पंतप्रधान बुधवार १७ सप्टेंबर रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करणात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि संघातील नियमानुसार नरेंद्र मोदी हे आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन राजकीय निवृत्ती स्वीकारणार, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे. RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का? अशी विचारणा सपकाळ यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना ७५ व्या वाढदिवसानिर्मित काय शुभेच्छा देणार, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, वयाच्या ७५ नंतर वानप्रस्थाश्रमात जावे असे रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुचनेनुसार नरेंद्र मोदी आता राजधर्माचे पालन करणार का? तसेच लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची ७५ वर्षाचे कारण देत जशी मार्गदर्शक मंडळात रवानगी केली तसेच मोदीही त्या मंडळात जाण्याचा मार्ग अवलंबणार का? अशी विचारणा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार विभागाने टिळक भवनमध्ये आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन काँग्रेस प्रदेशाध्यांनी केले. यावेळी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार भाई जगताप, माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, भूषण पाटील, सरचिटणीस व रोजगार स्वयंरोजगार विभागाचे प्रमुख, रोजगार मेळाव्याचे समन्वयक धनंजय शिंदे आदी उपस्थित होते. आयटी, बँकिंग, विमा, अशा विविध क्षेत्रातील ७५ कंपन्यांनी मेळाव्यात सहभागी होऊन शेकडो तरुणांची निवड केली.
देशात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. सत्तेतील भाजपाने नोकरीचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, परंतु काँग्रेस पक्षाने सध्या सत्तेत नसतानाही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेकडो तरुणांच्या हाताला काम व डोक्याला विचार देण्याचे काम केले आहे. यापुढे असे रोजगार मेळावे राज्यातील सर्व जिल्ह्यात घेतले जातील, असे हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत, केंद्रात २.५ कोटींपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत परंतु भाजपाचे सरकार या रिक्त जागांवर भरती करत नाही. दरवर्षी २ कोटी रोजगार देणार, मेगाभरती करणार या वल्गणा हवेतच विरल्या आहेत. भाजपा सरकार तरुणांच्या हाताला काम न देता शोषणावर आधारीत समाज निर्माण करत आहे. भाजपाच्या राज्यात श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढत आहे. राष्ट्रपुरुष, राष्ट्रसंत असतात तसे भाजपा राजवटीत दोन राष्ट्रीय शेठ असून त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरले जात आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.