रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 17:00 IST2025-08-09T16:58:52+5:302025-08-09T17:00:26+5:30
गडचिरोलीत रक्षाबंधन सणासाठी सिरोंचा येथे जात असताना दुचाकी रस्त्यालगत असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकली. या धडकेत एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
गडचिरोली : रक्षाबंधन सणासाठी सिरोंचा येथे जात असताना रस्त्यालगत असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकी आदळून अपघात झाला. यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर आई-वडील दोघेही जखमी झाले. ही घटना सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा येथे शनिवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
अपघातात शौर्य संतोष कोक्कू (वय, ८) या बालकाचा जागीच मृत्यू झाला. त्याचे वडील संतोष रामलू कोक्कू (वय, ४३) रा. आसरअल्ली यांचा डावा हात व पाय मोडून ते गंभीर जखमी झाले तर, आई सौंदर्या कोक्कू यांना किरकोळ दुखापत झाली. संतोष कोक्कू हे आसरअल्लीवरून रक्षाबंधन सणासाठी बहिणीकडे सिरोंचा येथे दुचाकीने जात होते. अंकिसा गावाजवळ पोहोचताच रस्त्याच्या कडेला उभ्या ठेवलेल्या रामकृष्ण चिरला यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीची भीषण धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की शौर्यचा जागीच मृत्यू झाला.
संतोष कोक्कू यांना फिट (मिरगी)आल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरु आहे.सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरु आहे.
तेलंगणाच्या वारंगल येथे उपचार सुरू
अपघातानंतर संतोष कोक्कू यांना सिरोंचा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने तेलंगणातील वारंगल येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सौंदर्या कोक्कू यांच्यावर सिरोंचा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.